यंदा मान्सून देशात वेळेमध्ये दाखल होण्याचे संकेत मिळाल्यामुळे एक प्रकारचे आल्हाददायी वातावरण निर्माण झाले आहे. केरळमध्ये यंदा मान्सून वेळेत दाखल होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मान्सूनचे केरळमध्ये १ जून रोजी आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने सांगितली आहे. तर तळकोकणात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होईल तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्रमध्ये जोरदार मान्सूनचे आगमन होण्याचे अंदाज आहे, अशी दाट शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
ट्वीटरवर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन राजीवन यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, यंदा मान्सून वेळत म्हणजेच १ जून रोजी दाखल होईल, असा प्रारंभिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग १५ मे आणि ३१ मे रोजी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार्या पावसाचा अधिकृतपणे अंदाज वर्तवेल. केरळात मान्सून वेळेवर दाखल झाला, तर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन वेळेवर होईल. यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पाऊस राहणार असून उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये संपूर्ण हंगामभर पाऊस राहण्याचा संकेत स्कायमेटने दिला आहे. देशामध्ये नैऋत्य मोसमी वार्यांमुळे मान्सूनचा प्रवेश होतो. सर्वप्रथम केरळमध्ये मान्सूनचं आगमन होते. दरवर्षी केरळात साधारण १२० दिवसांच्या पावसामध्ये सरासरी २०४.९ सेंमी मान्सूनचे प्रमाण नोंदवले जात असे. परंतू, केरळमध्ये गेल्या वर्षी सरासरीच्या तब्बल ९ सेंटिमीटर जास्त म्हणजेच २२२.७९ सेंटिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदाचे वातावरण मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक असून यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल. एरव्ही साधारण मे च्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून हजेरी लावणार असल्याने पुढे ३ महिने पडणाऱ्या पावसामध्ये नियमितता राहणार आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार साधारणता १५ मे पासून अधीमधी वळीवाचा पाऊस पडण्याची शकत्या वर्तवली जात आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे मान्सून लांबला होता. मात्र, यंदा तशी कोणतीही शक्यता नसल्याचे वृत्त हवामान विभागाने दिले आहे. त्यामुळे केरळात जर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला तर महाराष्ट्रातही मान्सून वेळेतच दाखल होण्याचा अंदाज आहे.
जगभर पसरलेली कोरोनाची पहिली, दुसरी लाट आणि तिसरी लाट येण्याचे संकेत, त्यामध्ये अनेक प्रकारच्या उभ्या ठाकलेल्या अडचणी, जसे कि ऑक्सिजनची अनियमितता, कोरोनावरील औषधांचा काळाबाजार, कामधंदे बंद झाल्याने दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि अंगाची लाही लाही करणारा उष्मा… अशा एकामागोमाग सुरु असलेल्या संकटातून, येणारा मान्सून नक्कीच आल्हाददायी ठरेल.