HomeDapoliहर्णेच्या समुद्रात मत्स्य दुष्काळ, मासळी व्यवसाय संकट

हर्णेच्या समुद्रात मत्स्य दुष्काळ, मासळी व्यवसाय संकट

मासळीच मिळत नसल्याने दर वाढले असले तरी त्याचा फायदा मच्छीमारांना होत नाही.

कोकणच्या समुद्रावर अवलंबून असलेला हर्णे बंदरातील मासळी व्यवसाय सध्या गंभीर संकटात सापडला आहे. गेले दोन महिने मासळीची आवक सतत घटत चालल्याने मच्छीमार हतबल झाले असून, अनेक नौकांनी थेट समुद्राकडे पाठ फिरविली आहे. सकाळी व संध्याकाळी चालणारा जोरदार लिलाव आता पटकन आटपत आहे. ‘मिळेल तेवढी मासळी आणि निभावला तर खर्च’ अशी अवस्था झाली असून, कमवायचं काय आणि खायचं काय ? हा प्रश्न मच्छीमार कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. हंगामाचे अजून चार महिने शिल्लक असताना हर्णै समुद्रात मासळीअभावी दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास हर्णे बंदरातील मासळी व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती मच्छीमार व्यक्त करीत आहेत. १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाला सुरुवातीला चांगले दिवस आले होते. मध्येच दोन-तीन वादळांचा फटका बसला असला तरी गणपतीनंतर हंगाम पुन्हा जोरात सुरू झाला होता. नोव्हेंबरपर्यंत मासळी मुबलक मिळत होती. त्या काळात पर्यटकांचीही चंगळ झाली होती; मात्र नोव्हेंबरनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. डिसेंबरपासून मासळीची आवक घटली आणि हीच स्थिती जानेवारीतही कायम राहिली. सुरुवातीला म्हाकूल मासळी चांगल्या प्रमाणात मिळत होती; पण दर कमी होते. शेवट शेवट म्हाकूळ मासळीचा दर ४०० रुपये किलो झाला होता; परंतु आता कोणीही ट्रॉलर म्हाकूळ मासळीसाठी जातच नाही. त्यानंतर कोळंबीची आवक बंपर झाली; मात्र आवक वाढताच दर घसरले. आता मासळीच मिळत नसल्याने दर वाढले असले तरी त्याचा फायदा मच्छीमारांना होत नाही.

कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर – नुकसान वाढत चालल्याने अनेक नौकामालकांनी मासेमारी उद्योग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी कामगारांना उतरवून त्यांचा हिशोबही करून दिला आहे. परिणामी, रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ट्रॉलर नौकांसोबतच दररोज ताजी मासळी आणणाऱ्या छोट्या फायबर नौकांनाही फटका बसला असून, किमान ५० ते ६० फायबर नौकांनी मासेमारी थांबविली आहे.

एलईडी, मलपी नौकांच्या मासेमारीकडे दुर्लक्ष – या परिस्थितीला कारणीभूत ठरणारी मुख्य बाब म्हणजे हर्णे बंदरासमोर सुरू असलेली एलईडी व मलपी फास्टर नौकांची अवैध मासेमारी, असा आरोप मच्छीमारांकडून होत आहे. या नौका पारंपरिक मच्छीमारांच्या हद्दीत बिनधास्त मासेमारी करत असल्याने त्यांच्या जाळ्यात मासळीच येत नाही. लोकप्रतिनिधी आणि शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी मच्छीमारांमध्ये आहे.

कमवायचं काय अन् खायचं काय ? – आठ दिवस मासेमारी करूनही केवळ चार ते पाच टप मासळी मिळते. दोन दिवसांपूर्वी एका नौकेला एक टप पापलेट मिळाले, त्याचा लिलाव अवघ्या ६५ हजारांत झाला; मात्र एका फेरीचा खर्चच दीड लाखांच्या आसपास जातो. नोकरांचा आठ दिवसांचा पगार सुमारे ३५ हजार, डिझेल, पाणी, अन्नसामग्री आणि इतर खर्च मिळून मोठा आर्थिक बोजा मच्छीमारांवर पडत आहे.

९०० पैकी १०० नौका समुद्रात मासेमारीसाठी – हर्णे बंदर पंचक्रोशीतील सुमारे ८०० ते ९०० नौका आहेत. त्यापैकी किमान ५०० नौका समुद्रात मासेमारीसाठी उतरल्या आहेत; परंतु त्यापैकी केवळ १०० नौकाच सध्या मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. उर्वरित नौका मासळीच न मिळाल्याने बंदरात उभ्या आहेत. किमान १०० ट्रॉलर नौका थेट आंजर्ले खाडीत उभ्या आहेत. २५ ते ३० नौका काम नाही म्हणून डागडुजी करून घेऊ, या भूमिकेत किनाऱ्यावरच थांबल्या आहेत; मात्र मासळी मिळत नसल्याने या नौका पुन्हा समुद्रात जातील की नाही, याबाबतही अनिश्चितता आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments