ममतांचा पराभव नाही, हा लोकशाहीविरोधी कट; संजय राऊतांची मोदी-शाहांवर घणाघाती टीका

बंगालमधील परिस्थिती इराण-इस्रायल युद्धासारखी; संजय राऊत यांनी केली 'इंडिया' आघाडीच्या समर्थनाची घोषणा.

Must read

मुंबई: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “हा ममता बॅनर्जींचा पराभव नाही, तर मोदी आणि अमित शहा यांनी यंत्रणांचा गैरवापर करून घडवून आणलेला एक लोकशाहीविरोधी कट आहे,” असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

इराण-इस्रायल युद्धाची दिली उपमा संजय राऊत यांनी बंगालमधील निवडणुकीच्या वातावरणाची तुलना थेट जागतिक स्तरावरील इराण आणि इस्रायलमधील युद्धाशी केली. ते म्हणाले की, “ज्याप्रमाणे युद्धात सर्व ताकद पणाला लावली जाते, तशीच परिस्थिती भाजपने बंगालमध्ये निर्माण केली होती. तिथे लष्कराचा वापर, आर्थिक दहशतवाद आणि अफवांच्या जोरावर ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नाही तर जाणीवपूर्वक मतदार यादीतून अनेक लोकांची नावे वगळून त्यांचा विजय रोखण्याचे कारस्थान रचले गेले.”

ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याबाबत मोठे विधान ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे राऊत यांनी समर्थन केले. “हा केवळ राजीनामा न देणे नसून निवडणूक आयोग आणि सरकारच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात पुकारलेले एक मोठे आंदोलन आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडी आता ममतांच्या पाठीशी खंबीर निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी आणि ‘इंडिया’ आघाडी यांच्यात काहीसे अंतर असल्याचे दिसत होते, मात्र आता चित्र बदलले आहे. संजय राऊत यांनी माहिती दिली की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि देशातील इतर प्रमुख नेत्यांनी ममता बॅनर्जींशी फोनवरून संवाद साधला आहे. “आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, तुम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून तुमची ताकद देशाला दाखवा,” असा विश्वास या सर्व नेत्यांनी त्यांना दिला आहे.

निवडणूक आयोग गुलामासारखा वागतोय? निवडणूक आयोगावर टीका करताना राऊत म्हणाले की, ही संस्था आता सत्ताधारी पक्षाची ‘गुलाम’ बनली आहे. त्यामुळे भविष्यात निवडणुका लढवायच्या की नाही, असा विचार करण्याची वेळ विरोधी पक्षांवर आली आहे. तसेच, भाजपमधील नेत्यांनाही त्यांनी साद घातली. “ज्याप्रमाणे आणीबाणीत जगजीवन राम हुकूमशाहीविरोधात बाहेर पडले होते, तसेच भाजपमधील काही स्वाभिमानी नेत्यांनी आता लोकशाही वाचवण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीत सामील व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article