पुणे: पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नसरापूर आणि पर्वतीमधील धक्कादायक घटना ताजी असतानाच आता मुळशी तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका फिरत्या आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षांच्या मतिमंद मुलीचा विनयभंग केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नेमकी घटना काय? मुळशी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती मतिमंद आहे. दुपारी २ च्या सुमारास एक आईस्क्रीम विक्रेता दुचाकीवरून गावात आईस्क्रीम विकण्यासाठी आला होता. उन्हाचा कडाका असल्याने पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी या विक्रेत्याकडे गेली.
यावेळी आरोपी पिंटू शिवकुमार (मूळचा उत्तर प्रदेशचा, सध्या राहणार सूस, मुळशी) याने मुलीच्या असहायतेचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने मुलीला आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले आणि तिचा विनयभंग केला. या अनपेक्षित प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिने आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून ती धावत घरी गेली आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
नागरिकांनी पकडले, पोलिसांनी आवळल्या मुसक्या मुलगी रडत घरी आल्यावर पालकांना संशय आला. तिने हकीकत सांगितल्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने आईस्क्रीम विक्रेत्याचा शोध सुरू केला. तोपर्यंत आरोपी दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, पण ग्रामस्थांनी त्याला गाठले आणि पकडून पौड पोलिसांच्या स्वाधीन केले.
पौड पोलिसांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलत आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये परप्रांतीय फेरीवाले आणि विक्रेत्यांच्या वाढत्या वावराबद्दल भीती आणि संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी अशा फेरीवाल्यांची कसून चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
