नागपूर: उपराजधानीतील कळमना परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका भीषण आगीच्या घटनेने खळबळ उडाली. चिखली लेआऊट येथील प्रसिद्ध टिंबर मार्केटमध्ये असलेल्या सॉ मिलच्या गोदामांना अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले आणि परिसरातील दोन मोठ्या टिंबर ट्रेडर्सचे गोदामातील कोट्यवधी रुपयांचे लाकूड जळून खाक झाले.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होते, तेव्हा कळमना येथील चिखली लेआऊट परिसरातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. येथील ‘रामेश्वर टिंबर ट्रेडर्स’ आणि ‘कमला टिंबर ट्रेडर्स’ यांच्या गोदामाला ही आग लागली होती. लाकूड अत्यंत ज्वालाग्राही असल्याने आगीने काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या उंच होत्या की लांबूनही त्या दिसत होत्या.
मोठं आर्थिक नुकसान: या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, दोन्ही गोदामांमधील मिळून सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सागवान आणि इतर प्रकारचे लाकूड जळून कोळसा झाले आहे. सुदैवाने, ही घटना रात्री घडल्याने गोदामात कोणीही कामगार नव्हते, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
अग्निशमन दलाची शर्थ: घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आगीची तीव्रता पाहून अधिक गाड्या पाचारण करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, लाकडाचा साठा मोठा असल्याने आग पूर्णपणे विझवण्यासाठी बराच वेळ लागला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
