जबलपूर क्रूझ दुर्घटना: ९ जणांचा मृत्यू, आईच्या कुशीत सापडला चिमुरड्याचा मृतदेह

मध्य प्रदेशातील बरगी धरणात पर्यटकांनी भरलेली क्रूझ उलटली; २३ जणांना वाचवण्यात यश.

Must read

नर्मदा नदीच्या पात्रात संथपणे चालणारी क्रूझ आणि आजूबाजूला निसर्गाचे सौंदर्य… हे सुखद दृश्य काही क्षणांतच भीषण दुर्घटनेत बदलले. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील प्रसिद्ध बरगी धरणाच्या जलाशयात एक मोठी क्रूझ उलटून झालेल्या अपघातात आतापर्यंत ९ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या भीषण दुर्घटनेत मनाला चटका लावून जाणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बचाव पथकाला जेव्हा काही मृतदेह सापडले, तेव्हा एका ४ वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह त्याच्या आईच्या कुशीत घट्ट विसावलेला होता. मृत्यूच्या दारात असतानाही आईने आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला असावा, हे पाहून बचाव पथकातील जवानांच्या डोळ्यांतही पाणी आले.

अशी घडली दुर्घटना: मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझमध्ये २९ ते ३० पर्यटक स्वार होते. सायंकाळच्या सुमारास नर्मदा नदीच्या बॅकवॉटरमध्ये अचानक वेगवान वारे वाहू लागले आणि लाटा उसळू लागल्या. या लाटांचा वेग इतका प्रचंड होता की क्रूझचे संतुलन बिघडले आणि ती मध्यधारेतच पालथी झाली. क्रूझ उलटताच पर्यटकांमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला.

स्थानिक नावाडी आणि बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तातडीच्या प्रयत्नांमुळे २३ पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, दुर्दैवाने ९ जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अंधारामुळे शोधमोहिमेत सुरुवातीला अडथळे आले, पण SDRF आणि स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर काम करत अनेकांचे प्राण वाचवले.

सध्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेने जबलपूरसह संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. पर्यटनाचा आनंद घेताना निसर्गाचा कोप आणि सुरक्षेच्या प्रश्नावर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article