जगभरात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इराण-इस्रायल युद्ध असो किंवा जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा भार पडत आहे. अशा परिस्थितीत, भारत, चीन आणि अगदी आफ्रिकेतील देशांमध्येही ‘इलेक्ट्रिक वाहनांचा’ (EV) कल प्रचंड वाढताना दिसत आहे.
चीनमध्ये क्रांती, तर भारतात दुचाकींचा जलवा आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या आकडेवारीनुसार, चीन आता इलेक्ट्रिक वाहनांचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. २०२४ मध्ये चीनमध्ये १.१ कोटीहून अधिक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली. रस्त्यावर धावणाऱ्या दर १० पैकी १ गाडी ही इलेक्ट्रिक आहे.
भारताचा विचार केला तर, येथे दुचाकी (Electric Scooters) आणि तीनचाकी वाहनांच्या विक्रीत १५ ते २५ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. शहरी भागात डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या आता मोठ्या प्रमाणावर बॅटरीवर धावत आहेत, ज्यामुळे खर्चात ५ ते १० टक्क्यांची बचत होत असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
कोस्टा रिका आणि इथिओपियाचे उदाहरण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेसारख्या प्रगत देशांपेक्षा लॅटिन अमेरिकेतील कोस्टा रिका सारख्या देशात इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण तिप्पट वेगाने वाढत आहे. तिथे विकल्या जाणाऱ्या एकूण नवीन गाड्यांपैकी १८% गाड्या इलेक्ट्रिक आहेत. इथिओपिया आणि उरुग्वे सारखे देश परकीय चलन वाचवण्यासाठी आणि महागड्या तेलाची आयात कमी करण्यासाठी ईव्हीला प्रोत्साहन देत आहेत.
चिनी कंपन्यांचे वर्चस्व स्वस्त आणि टिकाऊ बॅटरी तंत्रज्ञानामुळे चिनी कंपन्यांनी (उदा. BYD, MG, Geely) जागतिक बाजारपेठ काबीज केली आहे. पूर्वी जिथे टोयोटा सारख्या जपानी कंपन्यांचे राज्य होते, तिथे आता चिनी इलेक्ट्रिक मॉडेल्सनी जागा घेतली आहे. लोकांच्या मते, केवळ पर्यावरण वाचवण्यासाठी नव्हे, तर पैशांची बचत करण्यासाठी ते इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत.
