राज्यामध्ये कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आज 22 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ब्रेक द चेन म्हणजेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नअंतर्गत अधिक कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. हे कडक निर्बंधांचा कालावधी 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत असणार आहे. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे हा कडक निर्बंधाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसेंदिवस राज्यातील संक्रमित रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण निर्माण झाला आहे. तसेच राज्यामध्ये ऑक्सिनज, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि रुग्णांसाठी बेड्सचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रेक द चेनअंतर्गत लागू होणारी सुधारित नियमावली आज रात्री 8 वाजल्यापासून प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीमध्ये पूर्णतः कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्य करून ज्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त होते अशा लग्न समारंभासाठी दोन तासाची वेळ आणि फक्त 25 जणांच्या उपस्थितीतीमध्येच सोहळा पार पाडावा लागणार आहे, नाहीतर 50 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच राज्यांतर्गत प्रवास करायचा असेल तर ई-पास नाही पण फक्त मेडिकल इमर्जन्सी, अंत्यसंस्कार आणि अत्यावश्यक सेवेसाठीच प्रवासाची परवानगी दिली गेली असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबईची लाइफलाईन असलेल्या लोकलच्या प्रवासावर सुद्धा पुन्हा एकदा राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. सरकारी सेवेतील केंद्र राज्य आणि महानगर पालिकांच्या कर्मचारी तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि आरोग्य विषयक तातडीची गरज असलेल्या प्रवाशांनाच फक्त लोकलमध्ये प्रवेश स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने देखील त्यासंदर्भीय तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या स्थानकांची सर्व प्रवेश बंद करून केवळ एकाच ठिकाणाहून प्रवेश देण्यात येणार आहे. आणि त्या प्रवेशद्वारावर आरपीएफ जीआरपी यांचे कर्मचारी प्रत्येक प्रवासाचे आय कार्ड पाहूनच त्याला स्थानकामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच तिकीटासाठी सुद्धा खिडक्यांवर देखील आयकार्ड बघूनच तिकीट वितरीत केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
कडक लॉकडाऊनच्या काळातसुद्धा विनाकारण घराबाहेर पडून, रस्त्यावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मुंबईकरांवर आता पोलिसांची करडी नजर आहे. पोलीससुद्धा अशा लोकांवर कारवाई करण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. तसेच मुंबईमध्ये वाहनांसाठी कलर कोड सिस्टम वापरण्यात येणार आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. ठरलेल्या कलर कोड सिस्टमनुसार काही क्षेत्रांचे विभाजन करण्यात आले आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाडीला लाल रंगाचं वर्तुळ लावणे अनिवार्य असेल. तसेच विक्रीसाठी नेला जाणाऱ्या भाजीपाला गाड्यांसाठी हिरव्या रंगाचं तर इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गाड्यांवर पिवळ्या रंगाचं वर्तुळ असणं बंधनकारक केल आहे. मुंबईत होणारी वाहनांची कोंडी फोडण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही उपाययोजना आखली आहे. दरम्यान, या कलर कोडचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास कलम ४१९ अन्वये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिली.