फोर्ब्सने यावर्षीची म्हणजेच सन 2021 सालची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. जगभरात कोरोनाच्या भयंकर असलेल्या पार्श्वभूमीनंतरही हे वर्ष अब्जाधीशांसाठी या यादीनुसार विशेष ठरलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत यावर्षी 5 ट्रिलियन डॉलर्सची वाढ झाल्याचे दिसते आहे. फोर्ब्सच्या मते, क्रिप्टोकरन्सी आणि स्टॉकच्या किंमती यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढल्याने फोर्ब्सच्या 35 व्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी संख्येत वाढ झाली आहे. 2020 च्या यादीमधील 8 ट्रिलियन डॉलरमध्ये 5 ट्रिलियन इतकी वाढ झालेली दिसून येत आहे, ज्यामध्ये यावर्षी एकूण 13.1 ट्रिलियन डॉलर्स इतकी वाढ झालेली आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये यावर्षी 493 नवीन लोकांचा समावेश झाला आहे. पाहूया यावर्षीची यादी.
फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर अॅमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस सलग चौथ्या वेळी यांची निवड झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती 64 अब्ज डॉलर्स इतकी होती. अॅमेझॉनच्या शेअरचे मूल्य वाढल्याने त्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता जेफ बेजोस यांची संपत्ती 177 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
टेस्लाचे एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहेत. टेस्लाच्या शेअर्समध्ये 705 % वाढ झाल्याने त्यांची संपत्ती 151 अब्ज डॉलर्स झाली असून, जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची नोंद झाली आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट हे फ्रेंच लक्झरी वस्तू टायकून असून फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आहेत. LVMH चे शेअर्स 86% नी वाढल्याने त्यांच्या संपत्तीत जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी त्यांची संपत्ती 76 अब्ज डॉलर्स असून आत्ता 150 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे
फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत बिल गेट्स चौथ्या स्थानी आहेत. बिल गेट्स यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट, कॅनेडियन नॅशनल रेल्वे आणि ट्रॅक्टर निर्माता कंपनी डीरे अॅन्ड कंपनीचे शेअर्स असल्याने, त्याचे मूल्यकन जास्त आहे, बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 124 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानावर नाव आहे. त्यांची मालमत्ता मागील वर्षी 42.3 अब्ज डॉलर एवढी होती असून, यावर्षी त्याची संपत्ती थेट 97 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
बर्कशायर हॅथवेचे मालक वॉरन बफे यांची जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानावर वर्णी लागली आहे. त्यांची ओरेकल ऑफ ओमाहा म्हणूनही विशेष ओळख आहे. त्यांची एकूण संपत्ती 96 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
ओरेकल सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष लॅरी एलिसन जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 93 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये आठव्या स्थानी असून, त्यांची एकूण मालमत्ता 91.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
गूगलचे दुसरे सह-संस्थापक सर्गी ब्रिन जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये नवव्या स्थानावर असून, त्यांची एकूण संपत्ती 89 अब्ज डॉलर आहे.
रिलायन्सचे सर्वेसर्वा आणि भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये दहावे स्थान प्राप्त केले आहे. यासह मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये स्थान निर्माण केले आहे. त्यांची एकूण संपत्ती 84.5 अब्ज डॉलर्स आहे.