आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारचे दिन साजरे केले जातात, ज्यामध्ये मातृदिन, पितृदिन आणि बरेच काही दिवस वगैरे साजरे केले जातात. तसेच रुग्णांच्या सेवेमध्ये आपले आयुष्य व्यतीत करणाऱ्या आपल्या परिचारिकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आज १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मागील वर्षापासून वाढत चाललेल्या कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या लढ्यात डॉक्टर, परिचारिका, पोलीस फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून पहिल्या दिवसापासून आपल्या जीवाची पर्वा न करता आपली महत्वाची सेवा बजावत आहेत. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात सुश्रुषा करीत असलेल्या सर्व परिचारिकांना विशेष शुभेच्छाचे विविध इमेज्स सोशाल मिडीयावर पोस्ट केले जात आहेत. आज तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.
पण नेमका जागतिक परिचारिका दिन कधी सुरू झाला? पाहूया थोडक्यात…
जागतिक परिचारिका परिषदेचे १९७१ मध्ये आयोजन केले गेले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म आजच्या तारखेला म्हणजेच १२ मे ला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्याचे योजिले गेले.
नर्सिंग फाउंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल या धनवंत कुटुंबात जन्माला आल्या होत्या. तरीही त्यांनी स्वत:चे सर्व आयुष्य रुग्णसेवेला अर्पण करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवे मुळे अनेक सैनिकांचा युद्धादरम्यान होणारा मृत्यू आटोक्यात आला, उपचार मिळाल्याने जीव वाचवणे शक्य होऊ लागले. त्या काळात होणार मृत्यूदर हा ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर नेऊन ठेवण्यात आला होता. नायटिंगल या दिवसरात्र रुग्ण सेवेतच व्यतीत करत असत. अनेक रात्री जागून रुग्णांची सेवा करण्यात मग्न असत. रात्री हातात लॅम्प घेऊन त्या प्रत्येक रुग्णाची वैयक्तिकरित्या काळजी घेत असत, त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी या नावाने सुद्धा संबोधले जात असे.
कोणत्याही रुग्णालयामधील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या निगराणीखाली बरा होत असतो. परिचारिका या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दिवसरात्र सेवा करत असतात. रुग्णामध्ये सकारात्मकता निर्माण करून, त्यांना आनंदी ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करत असतात. जेणेकरून उपचाराला रुग्णाकडून लवकरात लवकर सकारात्मक रिस्पोन्स मिळून तो बरा होईल. आताच्या घडीलाही कोरोनासारख्या महाभयंकर संकटत परिचारिकांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. परिचारिका कुटुंबांतील सदस्यांची, घरातील वयोवृद्धांची, मुलांची, प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही पर्वा न करता दिवस-रात्र आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे बजावत आहेत. या कोरोनाच्या काळात तर घरातील सदस्यांना लागण होऊ नये म्हणून अनेक रुग्णालयातील परिचारिका गेले कित्येक दिवस हॉस्पिटलमध्येच वास्तव्य करत आहेत, आपल्या घरी देखील गेल्या नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. काही वेळेला डॉक्टरांपेक्षा एखाद्या नर्सच्या उपचाराने रुग्ण बरा होण्याची अनेक उदाहरणे आपण ऐकली असतील. त्यांच्या शिवाय वैद्यकीय क्षेत्र अपूर्ण आहे.
परिचारिकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. मात्र, तरीदेखील त्या समस्यांवर मात करून त्यावर पर्याय निर्माण करून, रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य देत आहेत. हजारो परिचारिका वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हैदोस सुरु आहे. या रियल फ्रंटलाईन हिरोच्या कर्तुत्वाला गौरवण्यासाठी विविध प्रकारची पोर्ट्रेट तयार करून तब्बल १४ विश्वविक्रमावर नाव कोरणारे कलाकार चेतन राऊत यांनी आणखी एक पोर्ट्रेट आजच्या खास दिनानिमित्त वेगळ्या प्रकारेच साकारले आहे. चेतन राऊत यांनी कोरोना योद्ध्यांचे मोझेक पोर्ट्रेटच्या माध्यमातून चित्र साकारले असून यामध्ये ६ रंगछटा असलेल्या ३२ हजार पुश पिनचा वापर करण्यात आला आहे. तसेच हे पोर्ट्रेट ४ बाय ६ फूट लांबीचे असून हे तयार करण्यासाठी चेतन राऊत यांच्यासोबत सिद्धेश रबसे, मयूर अंधेर आणि ४ वर्षांचा बाल कलाकार आयुष कांबळे यानेही मोलाचे सहकार्य केले आहे. अवघ्या ४८ तासांमध्ये त्यांनी हे चित्र पूर्ण केलं आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे हे पोर्ट्रेट पवई मधील चेतन यांच्या राहत्या घरीच त्यांनी बनविले आहे.