‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ जगभरामध्ये दरवर्षी १५ डिसेंबर रोजी विविध देशांमध्ये साजरा केला जात असे. परंतु, भारताने केलेल्या शिफारसीमुळे संयुक्त राष्ट्र महासभेने २१ मे या दिवशी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्याचे घोषित केले. भारताने चार वर्षांपूर्वी मिलान येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय खाद्य आणि कृषी संघटनेच्या अंतर सरकारी समूहाच्या बैठकी मध्ये हा प्रस्ताव मांडला होता. यापूर्वीही भारताच्या शिफारसी आणि घेतलेल्या पुढाकारामुळे २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले गेले होते.
विकसनशील देशांमध्ये चहाचं उत्पादन आणि वितरण करून लाखो परिवार आपला उदरनिर्वाह चालवतात. अनेक देशांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून चहा व्यवसायाकडे पहिले जाते. तसेच या उद्योगाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतात. विकसनशील देशांमध्ये चहा हे प्रमुख नगदी पिकांपैकी एक मानलं जाते. सकाळच्या दिनचर्येला चहापासून सुरुवात होते, प्रत्येकाच्या आयुष्यात चहाचे महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभराम्ध्ये २१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे चहाचे महत्व आणि चहा संबंधीच्या उदयोगधंद्याला, व्यापाराला उस्फुर्तपणे प्रतिसाद देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे असा आहे.
प्रत्येक गोष्ट साजरी करण्यामध्ये आणि त्याला ऐतिहासिक काहीतरी महत्व असतेच. पाहूया आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा नक्की काय इतिहास आहे ते थोडक्यात, जगातील प्रमुख चहा उत्पादक देश भारत, चीन, केनिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका हे आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा बांग्लादेश, यूगांडा, इंडोनेशिया, टांझानिया आणि मलेशिया या देशामध्येही चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आहे. जगामध्ये सर्वप्रथम चहाची शेती चीनमध्ये करण्यात आली असल्याची कथा प्रचलित आहे. त्या काळी चीनचा सम्राट शेनॉन्ग त्याच्या बागेमध्ये बसून चहा पित होता. त्यावेळी एक पान त्या उकळत्या पाण्यामध्ये येऊन पडलं. आणि अचानक पाण्याचा रंग बदलला आणि त्याला एक आगळा वेगळा सुगंधही येऊ लागला. चीनच्या सम्राटाला त्या पाण्याची चव खूप पसंद पडली. आणि त्यानंतर चहाचा शोध लागला अशी चीनमध्ये दंतकथा सांगितली जाते. आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवण्यासाठी भारताने २०१५ साली पुढाकार घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अॅन्ड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने यावर अनेक देशांचे सल्ले, विचार लक्षात घेऊन २१ मे हा जागतिक चहा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
अंदाजे १८२४ सालच्या दरम्यान म्यानमार आणि आसामच्या पर्वतीय भागामध्ये चहाच्या पानांचा शोध लागला. त्यानंतर इंग्रजांनी चहाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना यासाठी चीनमधून चहाचे बी मागवावे लागायचे. त्यानंतर आसामच्या भागातील चहाच्या बियांचा वापर सुरु झाला. ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी भारतामध्ये चहाचे उत्पादन घेतलं जायचं. आज चहा भारतातील सर्वात स्वस्त आणि लोकप्रिय पेय असून, आसामचा चहा तर जगभर प्रसिध्द आहे.
जगामध्ये चहाचे सेवन जास्त प्रमाणात करण्याऱ्या लोकांची कमी नाही. आवडत्या पेयापैकी एक पेय आहे. प्रत्येकाची व्यक्तिश: किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये चहा बनवण्याची पध्दत वेगवेगळी असते. चहाचे एक ना अनेक प्रकार जगाच्या कानाकोपर्यात पसरलेले आहेत. कुणाला फक्त काळी चहा आवडते, तर कोणी आलं घालून चहा प्यायला आवडतं तर कुणाला मस्त दुधामध्ये केलेला वाफाळलेला चहा प्यायला आवडतो. सर्व चहा प्रेमीना आंतरराष्ट्रीय चहा दिवसाच्या दरवळणाऱ्या शुभेच्छा.