ब्रिटनमध्ये जानेवारीच्या उच्चांकी स्थितीच्या तुलनेत नव्या रुग्णांत ९० टक्के घट झाली. यंदा वर्षाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत दररोज ५० हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून येत होते.कोरोनापीडित देशांत सामील ब्रिटनमध्ये दररोजच्या नव्या रुग्णांचे प्रमाण ३ हजारांहून कमी झाले आहे. मृत्यूतही निम्म्यांहून जास्त घट झाली आहे. फेब्रुवारीच्या दरम्यान युरोपमध्ये कोरोनाची नवी लाट आली आणि नव्या रुग्णांच्या संख्येत बर्याच मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. मात्र ब्रिटनमध्ये फेब्रुवारीत नव्या रुग्णांचे प्रमाण दोन तृतीयांश घटले. पूर्वी सर्वाधिक बाधित केसेस इथे असूनही ब्रिटनने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे , असे तज्ञांना वाटते.
ब्रिटनच्या यशाचे रहस्य इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनने एका संशोधनाच्या आधारे सांगितले. ब्रिटनने वेगाने आणि ठराविक व्यवस्थित टप्प्याटप्प्याने केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे मृत्यूची साखळी खंडित करण्यात यश मिळाले. ब्रिटनने १४ डिसेंबरपासून देशात लसीकरणला सुरूवात केलेली. आतापर्यंत ब्रिटनमध्ये ४८ टक्क्यांहून जास्त लोकसंख्येचा पहिला डोस घेऊन झाला आहे. ४ जानेवारीला पंतप्रधान जॉन्सन यांनी राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊनची घोषणा केली होती. जर्मनीत नवे रुग्णांतील घट वेगाने होत नसल्याने सरकार चिंतीत आहे. अँगेला मर्केल कमी कालावधीचा परंतु, कडक लॉकडाऊन करण्याच्या विचारात आहेत. जर्मनीत नोव्हेंबरपासून अनेक प्रकारची बंदी आहे. परंतु रुग्ण घटलेले नाहीत. म्हणूनच सरकारला असा लॉकडाऊन लावायचा आहे.
ब्रिटनमध्ये एस्ट्राजेनेका लस दिली जातेय. अनेक देशांनी या लसीमुळे रक्त गोठण्याची तक्रार केली होती, त्यामुळे त्या देशांमधील लसीकरण थांबवले गेले होते. परंतु, ब्रिटनला या लसीमुळे हानी न होता तुलनेत जास्त प्रमाणात लाभचं झाल्याचे स्पष्ट केले आहे. एस्ट्राजेनेका लस देण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. लसीकरणात युरोप पिछाडीवर पडले.
जानेवारीच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये ५० हजारांवर रुग्ण आढळून आले होते. पंतप्रधान जॉन्सन यांनी ४ जानेवारीला ६ महिन्यांसाठी राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर केला होता व त्याची अंमलबजावणी अतिशय व्यवस्थितपणे केली. त्यामध्ये ८ मार्चपासून शाळा २९ मार्चपासून दोन कुटुंबे किंवा ६ लोक बाहेर जाऊ शकतील इत्यादी नियम शिथिल केले होते. सप्टेंबरमध्ये ब्रिटनमध्ये लॉकडाऊनला विरोध केला गेला. जानेवारीत नव्या लॉकडाऊन नंतरही तुरळक विरोध होता, परंतु सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होते. जानेवारीतील लॉकडाऊनमध्ये प्रत्येक गोष्टी सुरू होण्यासाठी वेळेची मर्यादा होती. म्हणून लोकांत घबराट नव्हती.