राज्यात सध्या कोरोनाचा आणि सोबतच उन्हाचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक नियमावली लागू केली आहे. १५ दिवसांची कडक संचारबंदी जाहीर केल्याने घराबाहेर पडता येणार नाही आहे. जर अत्यावश्यक सेवेतीलच काही काम असेल तर घराबाहेर पडता येणार आहे. ऋतू बदलल्यामुळे मागील काही दिवसांपासून प्रचंड उष्मा जाणवत असून अंगाची लाहीलाही होत आहे. या ऋतूमध्ये तब्येतीची विशेष काळजी घेतलेली बरी. उन्हाच्या दाहामुळे अनेकदा शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणापेक्षा कमी होते, ज्यामुळे चक्कर येणं, मळमळ, डोकेदुखी, यांसारख्या समस्याचा सामना करावा लागतो.
वातावरणातील तापमानाचा पारा चढलेला असताना, पाणी न पिणं किंवा कमी पाणी पिण्याची चूक कधीही करु नका. कोरोना आणि लॉकडाऊन दुसरीकडे प्रचंड वाढलेला उष्मा, अशावेळी मुलांना कशामध्ये गुंतवून ठेवता येईल याचाच विचार सध्या पालकांना भांडावून सोडत आहे. सर्व मुले परीक्षा संपतात कधी आणि उन्हाळ्याच्या सुट्टया लागतात कधी याचीच वाट बघत असतात. सुट्ट्यांमध्ये नवनवीन गोष्टी शिकणे मनसोक्त मित्र-मैत्रिणीबरोबर धुडगूस घालणे, मजा लूटणे, अशा अनेक गोष्टी मुलांनी सुट्टीमध्ये करायच्या आधीच ठरवलेल्या असतात. त्यामुळे वर्षभर या सुट्ट्यांकडे डोळे लावून असतात. परंतु, सध्याच्या लॉकडाऊन आणि कोरोनाचं संक्रमण रोकण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे मुलांच्या आनंदावर पण निर्बंध आल्यासारखे झाले आहे.
परंतु, घरात राहून सुद्धा आयुष्य हायड्रेटेड ठेवता येते पाहूया कसे ते थोडक्यात. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये महत्त्वाचे बदल करणे गरजेचे असते. काही फळं आणि भाज्या खाण्याला आवर्जून प्राधान्य द्यावे. आज आपण अशाच काही फळं आणि भाज्यांवर नजर टाकणार आहोत, ज्यांच्या सेवनानं शरीरातील पाण्याची पातळी राखली जाउन शरीर डी-हायड्रेट होणार नाही.
आपल्या रोजच्या जेवणात समावेश असलेली काकडी. काकडीमध्ये 95 टक्के पाणी असतं. तसेच विटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियमचीही भरपूर मात्रा असते. काकडीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असल्याने शरीर डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठीही काकडीचा आहारात समावेश केला जातो.
दुसरा आहे टोमॅटो. टोमॅटो वर्षाच्या बाराही महिने बाजारात उपलब्ध असतो. यामध्येही पाण्याचं प्रमाण 95 टक्के असतं. याच्या वापरामुळं पोटॅशियम, फायटोकेमिकल्स सारखी पोषक तत्त्वं शरीराला मिळतात.
पुढे पाहूया टरबूज या फळाबद्दल. या फळामध्ये तब्बल 92 टक्के इतके पाणी असतं. त्यामुळं याच्या सेवनानं शरीरातील पाण्याची पातळीचे प्रमाण सम राखण्यास मदत होते. यामध्ये शरीराला आवश्यक असलेली फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, टॅमिनसारखी पोषक तत्त्वंही असतात.
सर्व फळांचा राजा आंबा. या हंगामात फक्त आंबेच खाऊन राहणारी माणसे सुद्धा आहेत. नाश्ता, दुपारच जेवण, रात्रीच जेवण फक्त आणि फक्त आंबा. आंब्याचा गोडवा जितका जिभेला आल्हाददायक वाटतो, तितकंच हे फळ अनेक पोषक तत्त्वांनी भरलेल आहे. यामध्ये सोडियम, फायबर, अ जीवनसत्व आणि 20 टक्क्यांहून जास्त प्रमाणात मिनरल्स आढळतात. सिझनल सर्व फळे खावीत त्यातील हा एक, कॅलरीवर लक्ष देणाऱ्यांपैकी कोणी असेल तर मात्र जरा जपूनच खावे. कारण आंब्यामध्ये अधिक प्रमाणात कॅलरी असतात.
या सिझन मधील अजून एक रसाळ फळ. संत्र मुळातच एक थंड फळ आहे. यामध्ये 88 टक्के पाणी असतं. या फळामध्ये जास्त प्रमाणात फायबर, अ आणि क जीवनसत्व आणि कॅल्शियम अशी पोषक तत्त्वं आढळतात. उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारच्या पाणीदार फळाच्या सेवनामुळं शरीरातील पाणी पातळीचा समतोल प्रमाणात राहतो. या फळाच्या सेवनामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर होऊन शरीर निरोगी राहते.