महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल खूपच प्रश्न विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये निर्माण होऊन संभ्रमीत अवस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात १० वी आणि १२ वी हा आपल्या भविष्य घडविण्याचा मुख्य पाया असतो. पण खरचं हा पहिला पाया रद्द करून कसं चालेल..? काही मुलांसाठी आयत पास होणार म्हणून नक्कीच ही आनंदाची गोष्ट वाटली असेल, परंतु, त्या मुलांनी खर तर अजून भविष्याबद्दल काहीच नियोजन केलेलं नसेल. पण खरचं जी मुल अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आपल भवितव्य घडविण्यासाठी धडपड करून, अगदी जीवाचे रान करून मेहनत घेऊन अभ्यास करत असतात त्याचं काय..!
इयत्ता १० वी म्हणजे साधारण वय वर्ष १५ ते १६, आयुष्याला योग्य वळण देऊन घडविण्याचे वय. जसे बालवाडी मध्ये दाखल केलेले मुलं हे मातीच्या गोळ्यासारखे असते, जसे आपण त्याच्यावर संस्कार करणार तसे ते आकार घेत जाते म्हणजेच वाढ होऊन उत्तमरीत्या जडणघडण होते. परंतु, जेंव्हापासून १० वीची परीक्षा रद्द ही बातमी वाचल्यापासून मन एकदम सुन्न झाले आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांची हीच मानसिक अवस्था असणार आहे. परीक्षा रद्द करून ११ वीत प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थ्यांचं मुल्यांकन नेमक कोणत्या आधारावर केलं जाइल आणि जो काही रिझल्ट दिला जाईल, त्याला किती टक्के मुलं आणि पालक सहमत असतील, आणि या रिझल्टचे रिचेकिंग सुद्धा होऊ शकत नाही. या मुल्यांकना बद्दल विद्यार्थी आणि पालक यांच्यात कमालीची उत्सुकता सोबत तेवढाच संभ्रमही बघायला मिळत आहे. दरम्यान, अकरावीच्या प्रवेशा बाबत प्रवेश परीक्षेचा पर्याय दिला जाण्याबाबत शिक्षण विभाग चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारीच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा घेता पास करुन पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर महत्वाची असेलेली नववीची परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली. नववीच्या मार्कांवरून १० वी मध्ये विद्यार्थी कोणत्या शैक्षणिक क्षमता गाठू शकतो हे ठरू शकते. १० वी परीक्षेसंदर्भात सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डाने सुद्धा परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. परंतु, या दोन्ही बोर्डामध्ये सेमिस्टर पद्धत अवलंबली जाते. आणि मग त्याशिवाय शालेय अंतर्गत मूल्यांकनाचे मार्क्स दिले जातात. या सर्व गोष्टींचा विचार करून त्या आधारावर विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल तयार केला जातो. परंतु, महाराष्ट्र बोर्ड सेमिस्टर सिस्टीम अवलंबत नसून त्यांच्या फक्त चाचणी, सहामाही आणि सर्व व शेवटची दहावी बोर्डाची परीक्षा पार पडते व शालेय अंतर्गत मूल्यांकनही फक्त 20 गुणांचंच असतं. त्यामुळे जर विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्वाच्या परीक्षा रद्द केल्या तर विद्यार्थ्यांना कोणत्या मार्क्सच्या आधारे गुण दिले जाणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतचं आहे.
दिवसेंदिवस गुणवत्तेवरून निर्माण होणारी स्पर्धा, अकरावीला भविष्य डोळ्यासमोर ठेऊन आवश्यक असलेल्या स्ट्रीममध्ये प्रवेशासाठी उडणारी धांदल, ज्याठिकाणी हवा आहे तिथे प्रवेश मिळेल कि नाही याबाबत मनात माजलेलं शंकांचं काहूर, तिथे जर प्रवेश नाही मिळाला तर पुढे काय..! हे सतावणारी चिंता. तसेच मराठी माध्यम, संपूर्ण इंग्रजी माध्यम, सेमी इंग्लिश मध्यम अशा विविध असलेल्या शिक्षण पद्धती, त्यांचे विविध बोर्ड जसे सीबीएसई, आयसीएसई आणि एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांमध्ये मार्कांवरून असणारी काटे कि टक्कर. सर्वाना मनाजोगत्या स्ट्रीममध्ये प्रवेश मिळेलच असे नाही, अथवा काही जणांना मिळेलही, पण तरी प्रश्न उरतो ते जर पायाच कच्चा राहिला तर प्रत्येक विद्यार्थी खरचं भविष्यात स्वताच्या पायावर उभा राहून आपले विश्व उभारू शकेल का ?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे पार पडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीची परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली. तसेच बारावीच्या परीक्ष वेळेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी त्याच वेळी दिली. कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात वाढत चालेल्या संक्रमणामुळे राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत १० वी परीक्षा रद्द करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच काही शिक्षण तज्ञांशी, महाराष्ट्र शिक्षण बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संसर्गामुळं वर्षभर प्रत्यक्ष पद्धतीनं शाळा न भरता वर्षभर ऑनलाईन शिक्षणपद्धतीने शिक्षण सुरु होते. दिवसेदिवस महाराष्ट्रातील कोरोना संक्रमणाची स्थिती वाईट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी पहिलं प्राधान्य विद्यार्थी, शिक्षक यांच आरोग्य असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पण तरीही काही प्रश्न हे अजूनही अनुत्तरीतच आहे.