मागील वर्षापासून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राची सुद्धा स्थिती फारच गंभीर व चिंताजनक झाली होती. सगळ्यात जास्त वेगाने त्याचा संसर्ग आणि मृत्यू सुद्धा अमेरिकेमध्ये झालेला दिसत आहे. परंतु, योग्य प्रमाणात आणि वेगाने लसीकरण मोठीम राबविल्याने अमेरिका या महामारीवर काही प्रमाणात मात करण्यात यशस्वी झाली आहे. या महामारीमध्ये मास्क या शस्त्राचा वापर केल्यामुळे काही प्रमाणात जीवन जगणे सुकर झाले आहे. मास्क सद्य जीवनात आपल्या प्रत्येकाच्याच जीवनाचा महत्वपूर्ण घटक बनला आहे. आता अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, देशातील ज्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा लोकांनी गर्दीची ठिकाणे सोडून इतर ठिकाणी मास्क वापरण्याची गरज नाही. तसेच ज्यांना ही लस अद्याप मिळालेली नाही त्यांनी सुद्धा काही विशिष्ट परिस्थिती शिवाय मास्क लावल्याशिवाय बाहेर जाण्याची परवानगी आहे.
मंगळवारी कोरोना विषाणूच्या साथीच्या निर्बंधांतर्गत सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सामान्य मनुष्य जीवनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अमेरिकेमध्ये या साथीने 5,70,000 एवढ्या संख्येने लोकांचा बळी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, ज्या लोकांनी अद्याप लस घेतलेली नाही, विशेषतः तरुण पिढी, ज्यांना आपल्या इम्युनिटी सिस्टीमवर विश्वास आहे आणि आपल्याला लसीची गरज नाही असे वाटते, त्यांना लस घेण्यासाठी हे चांगले निमित्त आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च सरकारी आरोग्य एजन्सीने संपूर्ण लसीकरण केलेल्या अमेरिकन नागरिकांना सांगितले आहे की, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला आपणच बांधील आहोत, आपण जर लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर बहुतेक वेळा मास्क शिवाय राहू शकतात, तसेच महामारीमुळे थांबविलेल्या काही गोष्टी पुन्हा सुरूवात करू शकता.
एजन्सीने असेही म्हटले आहे की, जिथे गर्दी असेल किंवा होण्याची शक्यता जास्त असेल, अशा एखाद्या कार्यक्रमात जाताना किंवा खेळ पाहण्यासाठी जाताना मास्क घालणे अजूनही बंधनकारक असून, सिनेमा हॉलमध्ये किंवा शॉपिंग करतानाही प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना एकटे बाहेर पडण्यासाठी, गाडीवरून प्रवास करण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासोबत बाहेर जाण्यासाठी मास्क वापरण्याची सक्ती नाही, फक्त गर्दीच्या ठिकाणी जनता स्वरक्षणासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. दरम्यान, इस्राईलसुद्द्धा कोरोन मुक्त झालेला पहिला देश असून तेथील प्रशासनाने सुद्धा लोकांना मास्क न वापरण्याचे आदेश दिले आहेत. इस्राईलमध्ये 81 टक्के लोकांनी कोरोनाच्या दोन्ही लसीचे डोस घेतले असून, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बायडन यांनीही सीडीसीच्या हवाल्यानुसारच ही बाब सांगितली आहे. त्यांसंबंधित त्यानी एक ट्विट केलं आहे कि, कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपण असामान्य अशी प्रगती केली असल्याने, सीडीसीच्या घोषणेनुसार जर तुमचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील आणि तुम्ही गर्दीची ठिकाणे टाळून बाहेर जाणार असाल तर तुम्हाला मास्क वापरणे गरजेचे नाही.