वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. आजच्या दिवसापासूनचं खर तर दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस म्हणजे गाई गुरे यांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये पुराणकाळापासून गाईला अनन्यसाधारण महत्व आहे. तिला मातेचा दर्जा दिला जातो. तिची पूजा केली जाते. त्यामुळे आज वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा करून त्यांना नैवेद्य म्हणून काही गोडधोड अथवा फराळ अर्पण केला जातो.
गेले काही महिने संपूर्ण देश कोरोना सारख्या महामारीचा सामना करत आहे. कोरोनामुळे काही परिवारांनी आपल्या कुटुंबातील सदस्याना गमावले आहे. त्यामुळे देश अशा प्रकारच्या संकटात असतानाही सर्वत्र दिवाळी आनंदाने पण साधेपणाने साजरी केली जाणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे दिवाळीच्या खरेदीवर मर्यादा आल्या आहेत. बरेच जण बाजारात खरेदीला न जाता ऑनलाईन खरेदीलाच पसंती देत आहेत. अशाप्रकारे सगळीकडे दिवाळीची तयारी सुरु आहे.
In some states like Maharashtra #vasubaras is celebrated as Day 1 of #Diwali !Here Lord Krishna is shown doing cow-calf puja on #VasuBaras @ParagKMT pic.twitter.com/8KZzkxW6OP
— Ranjeet Kate (@katranjeet) November 12, 2020
वसुबारस बद्दल सांगण्यात येणारी आख्यायिका अशी आहे कि, समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न होऊन, त्यातील नंदा नावाच्या गाईला उद्देशुन वसुबारस हे व्रत करण्यात आले. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी अथवा संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करतात. बघायला गेलं तर वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होते. सकाळचं अंगणात सडा घालून विविध रंगांची रांगोळी काढून त्यावर दिवे अथवा पणत्या लावून दिवाळीची सुरुवात होते. असे म्हणतात कि आजच्या दिवशी गाई पासून मिळणारे पदार्थ म्हणजेच दुध, दही, तूपाचे पदार्थ खात नाहीत. उडीदाचे वडे, भाताची खीर आणि फराळ अथवा अजून काही गोडधोडाचे पदार्थ करून गायीला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवी स्थिर व्हावी यासाठी देखील या दिवशी वासरू असलेल्या गायीची विधिवत पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सौभाग्यवती स्त्रिया गायीच्या पायावर पाणी घालून, हळद-कुंकू व अक्षता वाहून फुलांची माळ घातली जाते. ग्रामीण भागांमध्ये ज्यांच्या घरी गुरे असतात, त्यांच्या घरी सकाळचं गोठा स्वच्छ करून, गुरांना आंघोळ घालून, पुरणावरणचा स्वयंपाक करून मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर नैवेद्य खायला दिला जातो. पुष्कळ स्त्रियांचा त्या दिवशी उपवास असतो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख समृध्दी लाभावी म्हणून वासुबारासची पूजा केली जातात. वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणांनी दिवाळी साजरा केली जाते. अंगणामध्ये सर्वत्र दिवे लावत, अंध:कार दूर करून सर्वत्र प्रकाशमान करणारा त्याचप्रमाणे मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायी सण आहे.