कराडच्या चारुदत्त साळुंखे याने UPSC-IES परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून देशात प्रथम येण्याचा मान मिळवून महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचविले आहे. सर्वसामान्य घरातून आलेला चारुदत्त ग्रामीण भागातील मुलांसाठी आदर्श ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोईसुविधा आणि मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील नक्कीच यश मिळवू शकतात याचंच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे चारुदत्त साळुंखे. साताऱ्यातील चाफळ सारख्या ग्रामीण भागातील रहिवासी असून त्याचे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल कराड येथून दहावीला 94.55 टक्के गुणांसह उत्तीर्ण करणाऱ्या चारुदत्त साळुंखे याची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चीतच प्रेरणादायी आहे.
कोण आहे चारुदत्त साळुंखे ?
खाजगी संस्थेत क्लर्क असणाऱ्या मध्यमवर्गीय मोहनराव साळुंखे आणि प्राथमिक शिक्षक असणाऱ्या संगिता साळुंखे यांचा मुलगा चारुदत्त साळुंखे याने दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण घेऊन शैक्षणिक वाटचालीस सुरुवात केली. दहावीनंतर SGM कॉलेज कराड येथून 92.33 टक्क्यांसह विज्ञान शाखेतून बारावी पुर्ण केली, बारावी विज्ञान शाखेतूनच MHT-CET परीक्षेत 184 गुण मिळवून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या अटॉनॉमस कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. COEP कॉलेजमधून शेवटच्या वर्षाला असताना एकाहून एक वरचढ प्रायव्हेट कंपन्यामधून नोकरीच्या संधी चाळून येत असताना देखील खाजगी क्षेत्रात जॉब न करता ज्या क्षेत्रातून आपण राहतो, त्या समाजाला पर्यायाने आपल्या देशाला फायदा होईल अशा क्षेत्रात म्हणजेच शासकीय सेवेमध्ये अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. समाजाप्रती, देशाप्रती आपली असणारी बांधिलकी चारुदत्त साळुंखे याबद्दल मनाशी गाठ बांधून ठेवली होती.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना टेक्नीकल क्षेत्राला निवडून अखिल भारतीय स्तरावर झालेल्या GATE 2020 या परीक्षेतून सबंध देशातून 48 वा क्रमांक मिळवत यशाच्या कमानीत नवीन विक्रम प्रस्थापित केला. या यशाच्या जोरावरच सबंध देशाच्या टेक्नीकल क्षेत्राला दिशा देणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या संशोधक पदाच्या मुलाखतीसाठी त्यांची निवड झाली. भाभा अणुसंशोधन केंद्रातील मुलाखत टेक्नीकल रिसर्च इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात सर्वात कठीण पण तेवढीच महत्वाची समजली जाते. संबंध देशातील या क्षेत्रातील तज्ञ मुलाखतकार सर्वोत्कृष्ट अशा संशोधकांची निवड करतात, तब्बल दीड तास हर तर्हेने चाललेल्या मुलाखती मधून चारुदत्त साळुंखे हे संशोधक म्हणून निवड होऊन यशस्वी झाले.
त्यानंतर UPSC-IES ची मुख्य परीक्षादेखील चारुदत्त पास झाला, भाभा रिसर्च सेंटरची मुलाखत आणि UPSC मेन्स परीक्षाच्या अवघ्या एक महिना आधी वडील कोरोनाशी झुंज देऊन घरी परतले होते. अशा कठीण प्रसंगाच्या वेळीही धीराने आणि संयमाने वागून कुटुंबियांची काळजी घेत मेन्सची तयारी आणि मुलाखतीची तयारी पुर्ण केली आणि यशस्वीरीत्या मुलाखत देऊन BARC मध्ये निवड झाली. त्यानंतर अवघ्या एक महिन्यात UPSC च्या मुलाखतीसाठी पात्र ठरला. ग्रामीण भागाचा, आर्थिक परिस्थितीचा, कौटुंबिक गोष्टींचा अशा कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड मनात न बाळगता ध्येयाच्या दिशेने मेहनतीने वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळते हेच चारुदत्त साळुंखे यांच्या यशाचं रहस्य आहे. संबंधित स्पर्धापरीक्षा आणि यातील संधी याविषयी प्रत्येक गरजूला मार्गदर्शन करण्याची तयारी असल्याचा शब्द चारुदत्त साळुंखे यांनी दिला आहे. सर्व स्तरातून त्यांच्या या यशाबद्दल चारुदत्त साळुंखे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.