गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नूतन वर्षांचा प्रारंभ. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, दिवाळी सणातील पाडवा हे साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते तसंच महत्त्वपूर्ण नवनवीन संकल्पही केले जातात. सण साजरे करण्यामागे पारंपरिक, धार्मिक, महत्त्वासह नैसर्गिक व आपल्या आरोग्याशी निगडीत अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या असतात.
गुढीपाडवा सण
मराठी नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा गडू बसवून गुढी उभारली जाते. ही गुढी पावित्र्याचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते, तो हा विजयोत्सवाचा दिवस. गुढी ही घरातून वाईट असुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे सूचक आहे. तसेच याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने आणि गुळाचे सेवन करण्यांचं विशेष महत्त्व आहे. याच दिवशी कडुलिंबासह अन्य पदार्थ एकत्रित करून प्रसाद तयार करून ग्रहण केला जातो. तसेच उन्हाळयाचे आजार होऊ नयेत तसंच आरोग्य निरोगी राहावे यासाठी कडुलिंबाची पाने व गूळ खाण्याचा सल्ला आपले थोर मोठे आपल्याला देतात. झोप न येणे, पित्त वाढणे, भूक न लागणे, पोटाचे विकार, त्वचाविकार, त्वचेवरील डाग, सांधेदुखी, तोंडाचे विकार यासह एक ना अनेक आजारांवर कडुलिंबाचा पाला व गूळ रामबाण आयुर्वेदिक उपाय पूर्वापार ठरतो आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण दैनंदिन स्वरुपातही कडुलिंबाची पाने व गुळाचे सेवन केल्यास कोणते आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.
कडुलिंबाच्या पानांची चव जरी कडू असली तरीही याद्वारे मिळणारे सर्वाधिक फायदे आहेत. उन्हाळ्यात शरीराची उष्णतेची पातळी वाढून काही आजार होण्याची शक्यता असते. या समस्यांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊनचं कडुलिंबाच्या पाल्याचे वेगवेगळ्या स्वरुपात सेवन करात येते. कडुलिंब ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून, यामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी व्हायरल असे बहुगुणी गुणधर्म आहेत. तसंच यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, फायबर, फॉस्फरस, पोटॅशिअम यासारख्या पोषण तत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
हल्ली बहुतांश जण वजन घटवण्यासाठी महागड्या स्वरुपातील औषधोपचार करतात. याऐवजी आयुर्वेदिक उपचारांची मदत घेतल्यास कित्येक आरोग्यदायी फायदे होतात. यापैकीच एक उपाय म्हणजे कडुलिंब. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले तर शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. शरीरातील हानिकारक घटक यामुळे सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात. यामुळे पचन प्रक्रिया व चयापचय क्षमता सुरळीत होते.