राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, दोन दिवसांनी होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेबाबत राज्य सरकारने योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी फोनद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोरोना परिस्थिती पाहता, एमपीएससी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची महत्त्वाची मागणी केली आहे.
11 एप्रिलला एमपीएससीची पूर्व परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संक्रमणामुळे ही परीक्षा सद्य परिस्थितीत रद्द करण्यात यावी, अशी मागणीचा सर्व स्तरातून जोर धरला जात आहे. मागील महिन्यात पुण्यामध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षेच्या नियोजित तारखा पुढे ढकलल्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. मात्र यावेळी कोरोनाची भयंकर परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या भूमिकेत बदल झाला आहे. यावेळची परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या संदर्भात सद्य स्थितीत परीक्षा रद्द करण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा मसलत केली.
एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे राज्यातील अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याने, तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आपला स्थानिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांमध्ये जावे लागणार असल्याने आणि विकेंड संचारबंदी असल्याने प्रवास आणि इतर गोष्टी पूर्णपणे अशक्य होऊन बसणार आहे. तसेच वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे स्थिती भयावह झाली आहे, असे मत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे मांडले आहे. राज ठाकरेंनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास कोणतीचं प्रतिक्रिया अथवा आश्वासन देण्यात आले नसले तरी त्यांच्या भूमिकेचा सकारात्मकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
येत्या रविवारी 11 एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वनियोजित पूर्व परीक्षा होती. परंतु, कोरोनाची गंभीर स्थिती पाहता या परीक्षेवर अनिश्चिततेचं वादळ घोंघावत होतं. परंतु, अद्याप सरकारकडून परीक्षेबाबत एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळाली नव्हती. त्यातच राज्य शासनाने 30 एप्रिलपर्यंत कठोर नियमावलींचे निर्बंध जरी केले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन पूर्ण दिवस पूर्णपणे संचारबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला कशी होणार असा प्रश्न परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्वाना पडला होता. मात्र, संचारबंदीमुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे निश्चित झाले असून, पुढील तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात येतील.
राज्यात 11 एप्रिल रोजी पूर्व नियोजित असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वाढती कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या दिसत असताना 11 एप्रिल रोजी राज्यात सर्वत्र होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी सर्व स्तरातून मागणी होतचं होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली, यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि संबंधित अधिकारी यांच्यामध्ये ही बैठक पार पडली व या एकत्रित बैठकीनंतर हा निर्णय घेतला गेला.