कोरोना काळात कोण कसे उपयोगी पडेल याचं काही नेम नाही. कोरोनाच्या भीतीने जिथे घरचे देखील काही वेळेला पाठ फिरवतात, तेंव्हा इतरांकडून अपेक्षाच करणे व्यर्थ. परंतु, विशेषत: या महामारीच्या काळात अनेक व्यक्तींना असे काही चांगले अनुभवही शेअर केले आहेत. ज्यावेळी आपल्या माणसांनी साथ सोडली तेव्हा काही परक्या व्यक्ती देवासारख्या धावून आल्या आहेत. तेही अगदी स्वत:च्या प्राणांची आहुती देत. असाच काहीसा प्रकार नागपूरमध्ये घडला आहे.
एका 85 वर्षीय आजोबांनी स्वत:चा ऑक्सिजन बेड सोडून, एका तरुण व्यक्तीला जीवदान दिले आहे. परंतु, यामध्ये पुढील तीन दिवसात त्यांना मृत्यूने कवटाळलं. नारायण भाऊराव दाभाडकर असं या व्यक्तीच नाव आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दाभाडकर यांच्याविषयी ट्वीट शेअर करून जनमानसासमोर माहिती मांडली आहे.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बर्याच काळापासून स्वयंसेवक असलेले नारायण भाऊराव दाभाडकर यांना कोरोनाची लागण झाल्याने एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावून 60 वर आल्याने, जी साधारण ९५ तरी लागते, त्यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांनी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात भरती केले. परंतु, तेथे त्यांनी पहिले कि एक महिला तिच्या चाळीशीमधील नवऱ्यासाठी ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी कसोसीने प्रयत्न करत होती. तिची चाललेली वणवण पाहुन नारायण दाभाडकर खूप दुखी झाले आणि त्यांनी मोठ्या निर्धाराने स्वत:चा बेड या स्त्रीच्या नवऱ्याला देण्याचं ठरवलं.
“मैं 85 वर्ष का हो चुका हूँ, जीवन देख लिया है, लेकिन अगर उस स्त्री का पति मर गया तो बच्चे अनाथ हो जायेंगे, इसलिए मेरा कर्तव्य है कि मैं उस व्यक्ति के प्राण बचाऊं।'' ऐसा कह कर कोरोना पीडित @RSSorg के स्वयंसेवक श्री नारायण जी ने अपना बेड उस मरीज़ को दे दिया। pic.twitter.com/gxmmcGtBiE
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 27, 2021
सुरुवातीला नारायण दाभाडकर यांच्या अशा निर्णयाला डॉक्टर आणि त्यांच्या घरच्यांनी सपशेल विरोध दर्शविला, परंतु, एक मोलाचं कार्य करायचे ठरवलेल्या या आजोबांच्या निर्धारामुळे सगळे झुकले. मी आत्ता ८५ वर्षाचा असून माझे जीवन जगून झाले आहे, या महिलेला जर वेळीच बेड मिळाला नाही आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला तर या वयात त्यांची मुलं अनाथ होतील असं म्हणत ते आपल्या निर्णयावरून जराही हलले नाहीत. मी स्वेच्छेने असा निर्णय घेत असल्याचे त्यांनी रुग्णालयाला लिहूनही दिले आणि त्यानंतर दाभाडकर यांना डिस्चार्ज देउन घरी सोडण्यात आले. मात्र घरी आल्यावर तीनच दिवसात त्यांची प्राणज्योत मालवली. मरावे परि कीर्ती रुपी उरावे याचा अनुभव नक्कीच नारायण दाभाडकरांच्या कृतीतून नागपुरकरानाच नव्हे तर सर्व जगभरातील लोकांना आला असेल. त्यांच्या या उल्लेखनीय कृत्याचे सर्वत्र कौतुक होत असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत या आजोबांच्या मानवतेच्या सहृदय कृत्याला सलाम ठोकला आहे.
सध्याचा काळ नकारात्मकतेकडे झुकलेला असून, अशा घडणाऱ्या घटना जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून टाकतात. त्यांनी जगासमोर प्रत्यक्ष कृती करून एक आदर्श घालून दिला. यातून आणखी एक बोध मिळाला की दान करण्यासाठी प्रत्येकाला रतन टाटा होणे गरजेचे नाही, परंतु अंगात मदत करण्याची दानत असली पाहिजे, तर कुठल्याही पद्धतीने दान किंवा मदत करणे शक्य होते. आजचा काळ हा सर्वांचीचं परीक्षा घेणारा आहे. माणूस म्हणून तर आपण जगतो आहोतच, पण थोडी माणुसकीही जपून या आजोबांसारखा आदर्श जागवूया.

 
                                    