आजकाल आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर मेट्रो असो, रेल्वे असो किंवा ऑफिसचा लंच ब्रेक—प्रत्येक जण आपापल्या स्मार्टफोनमध्ये बुडालेला दिसतो. लोकांच्या हातातील हालचाली वाढल्या आहेत, पण तोंडातील शब्द मात्र कमी झाले आहेत. अरिझोना विद्यापीठाने केलेल्या एका ताज्या संशोधनातून एक चिंताजनक वास्तव समोर आले आहे: मानवी संवादात मोठी घट झाली असून, लोक आता पूर्वीपेक्षा खूपच कमी बोलत आहेत.
शब्दांची जागा इमोजींनी घेतली! अरिझोना विद्यापीठाच्या या संशोधनानुसार, २००५ ते २०१९ या काळात लोकांच्या दररोजच्या बोलण्यातील शब्दांच्या संख्येत तब्बल २८% घट झाली आहे. मानसशास्त्रज्ञ मॅथियास मेहाल यांच्या मते, ही घट इतकी मोठी आहे की आपण दरवर्षी सरासरी १.२ लाख शब्द कमी बोलत आहोत. २००५ मध्ये एक व्यक्ती दिवसाला सुमारे १६,६०० शब्द बोलायची, ती संख्या २०१९ पर्यंत १२,००० च्या खाली आली आहे.
विशेषतः २५ वर्षांखालील तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. ही पिढी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्यक्षात बोलण्यापेक्षा ‘टेक्स्ट मेसेज’ किंवा ‘इमोजी’चा वापर करणे अधिक पसंत करत आहे.
का कमी होतोय संवाद? यामागे तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि बदललेली जीवनशैली ही प्रमुख कारणे आहेत: १. डिजिटल क्रांती: पूर्वी ज्या गोष्टींसाठी आपण एकमेकांशी बोलायचो, त्या आता एका क्लिकवर होतात. मग ते हॉटेलमध्ये ऑर्डर देणे असो किंवा दुकानातील पेमेंट. ‘डिजिटल पेमेंट्स’ आणि ‘सेल्फ-सर्व्हिस’मुळे लोकांशी बोलायची गरजच उरलेली नाही. २. रिमोट वर्क: घरून काम करण्याच्या पद्धतीमुळे ऑफिसमधील सहकाऱ्यांशी होणाऱ्या गप्पा-टप्पा बंद झाल्या आहेत. ३. स्मॉल टॉकचा अभाव: रस्त्याने चालताना ओळखीच्या व्यक्तीशी किंवा अनोळखी लोकांशी होणारा छोटासा संवाद (Small Talk) आता दुर्मिळ झाला आहे.
संवाद का महत्त्वाचा आहे? प्रोफेसर जिलियन सेंडस्ट्रोम यांच्या मते, अनोळखी लोकांशी केलेले छोटे-छोटे संवाद आपल्या मानसिक आरोग्यासाठी ‘बूस्टर’चे काम करतात. जेव्हा आपण शेजाऱ्यांशी किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी हसून बोलतो, तेव्हा आपली मनस्थिती सुधारते.
लक्षात ठेवा, बोलताना चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातील चढ-उतार जे नाते निर्माण करतात, ते एखादा इमोजी कधीच करू शकत नाही. संवाद हे एक ‘कौशल्य’ आहे आणि जर आपण त्याचा सराव सोडला, तर आपण सामाजिकदृष्ट्या एकाकी पडू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुणासोबत असाल, तेव्हा फोन बाजूला ठेवा आणि मनापासून गप्पा मारा!
