इम्रान खान यांना हटवण्यासाठी अमेरिकेचा कट? ‘त्या’ गुप्त दस्तऐवजाने पाकिस्तानात खळबळ

रशिया दौरा आणि लष्करी तळ नाकारल्याने अमेरिका संतापली होती; 'सायफर' लीकमुळे पाकिस्तानी लष्कर आणि वॉशिंग्टनचे कनेक्शन उघड.

Must read

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना केवळ देशांतर्गत विरोधकांमुळेच नव्हे, तर एका आंतरराष्ट्रीय षड्यंत्रामुळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते का? या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला आता एका मोठ्या गुप्त दस्तऐवजाच्या (Secret Cable) खुलाशामुळे पुन्हा नव्याने तोंड फुटले आहे. अमेरिकेचे शोधपत्रकारिता संकेतस्थळ ‘ड्रॉप साईट’ (Drop Site) ने ‘केबल I-0678’ म्हणून नोंद असलेला एक अत्यंत संवेदनशील मूळ दस्तऐवज प्रसिद्ध केला असून, याला पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात ‘सायफर’ (Cypher) म्हणून ओळखले जाते.

नेमकं काय आहे या ‘सायफर’मध्ये? या लीक झालेल्या दस्तऐवजात मार्च २०२२ मधील एका गुप्त बैठकीचा तपशील आहे. ही बैठक अमेरिकेतील पाकिस्तानचे तत्कालीन राजदूत असद मजीद खान आणि अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी डोनाल्ड लू यांच्यात झाली होती. या संभाषणात डोनाल्ड लू यांनी पाकिस्तानी राजदूतांशी बोलताना अत्यंत कडक आणि थेट भाषा वापरली होती.

डोनाल्ड लू यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले होते की, “जर इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव यशस्वी झाला आणि ते सत्तेवरून दूर झाले, तर वॉशिंग्टन पाकिस्तानवरील आपला सर्व राग विसरून जाईल आणि ‘सगळे काही माफ केले जाईल’. मात्र, जर ते पंतप्रधानपदावर कायम राहिले, तर युरोप आणि अमेरिकेकडून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्णपणे एकटे पाडले जाईल.” विशेष म्हणजे, या संभाषणांनंतर अवघ्या काही दिवसांतच इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानात अविश्वास ठराव आणून त्यांचे सरकार पाडण्यात आले.

इम्रान खान यांच्यावर अमेरिका का चिडली होती? अमेरिकेच्या या नाराजीमागे इम्रान खान यांचा रशिया दौरा आणि युक्रेन युद्धाबाबत घेतलेली भूमिका कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, अगदी त्याच काळात इम्रान खान मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीला गेले होते. अमेरिकेने इम्रान खान यांना हा दौरा रद्द करण्यास सांगितले होते, मात्र खान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अमेरिकेच्या मते, पाकिस्तानने युक्रेन युद्धाच्या बाबतीत घेतलेली ‘आक्रमक तटस्थ’ भूमिका ही पूर्णपणे इम्रान खान यांच्या वैयक्तिक धोरणामुळे होती. याशिवाय, अमेरिकेला पाकिस्तानात लष्करी तळ हवे होते, ज्याला इम्रान खान यांनी जाहीरपणे नकार दिला होता.

पाकिस्तानी लष्कराची गुप्त भूमिका? या संपूर्ण वादात पाकिस्तानच्या बलाढ्य लष्कराची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जुलै २०२१ मध्येच, म्हणजे इम्रान खान पंतप्रधान असताना, त्यांच्या पाठीमागे लष्कराने अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘CIA’ च्या इस्लामाबादमधील एका माजी प्रमुखाला वॉशिंग्टनमध्ये आपला लॉबिस्ट (मध्यस्थ) म्हणून नियुक्त केले होते. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पंतप्रधान असूनही इम्रान खान यांना लष्कराच्या या हालचालींची कोणतीही कल्पना नव्हती.

इम्रान खान यांच्या आरोपांना बळ सध्या पाकिस्तानातील आदिआला तुरुंगात बंद असलेले इम्रान खान पहिल्यापासूनच ओरडून सांगत होते की, त्यांच्या सरकारला पाडण्यामागे विदेशी शक्तींचा (अमेरिकेचा) हात आहे. तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा समितीने हे दावे फेटाळून लावले होते, मात्र आता हा मूळ दस्तऐवजच समोर आल्यामुळे इम्रान खान यांच्या दाव्याला मोठे बळ मिळाले आहे. पाकिस्तानच्या लष्कर आणि विरोधकांनी अमेरिकेसोबत मिळून रचलेला हा कट होता का, या चर्चेने आता जागतिक स्तरावर पुन्हा जोर धरला आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article