युरोपमधील प्रगत आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेला देश ‘एस्टोनिया’ आता भारतासोबतचे आपले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गस त्साहकना (Margus Tsahkna) यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाला भेट देण्याचे अधिकृत आणि आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी एस्टोनियाला भेट दिल्यास आमच्या देशाला अत्यंत आनंद होईल आणि हा दौरा दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये एक नवा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
एका विशेष मुलाखतीत परराष्ट्र मंत्री त्साहकना यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या व्यापारी आणि धोरणात्मक संबंधांवर प्रकाश टाकला. एस्टोनिया हा लोकसंख्येच्या दृष्टीने केवळ १३ लाख लोकांचा छोटासा देश असला, तरी तंत्रज्ञानात तो जगात आघाडीवर आहे. तर दुसरीकडे भारत ही १४० कोटी लोकसंख्या असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आकारातील हा फरक दोन्ही देशांना एकमेकांसाठी उत्तम भागीदार बनवतो, असे त्साहकना यांनी नमूद केले.
आयटी, एआय आणि संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी
एस्टोनियाने भारताच्या आर्थिक विकासाचे आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचे कौतुक केले आहे. त्साहकना म्हणाले की, “माहिती तंत्रज्ञान (IT), आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि संरक्षण क्षेत्रात (Defence Industry) एस्टोनिया हा भारतीय कंपन्यांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. एस्टोनिया हा भारतीय उद्योगांसाठी संपूर्ण युरोपीय बाजारपेठेचे (EU Markets) प्रवेशद्वार ठरू शकतो.” राजकीय नेत्यांसोबतच भारताच्या व्यापारी शिष्टमंडळानेही एस्टोनियाला भेट द्यावी, जेणेकरून दोन्ही देशांमधील व्यावसायिक संधींना गती मिळेल, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
युक्रेनच्या उभारणीत भारताच्या सहभागाची अपेक्षा
या मुलाखतीदरम्यान परराष्ट्र मंत्र्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. एस्टोनिया २०२७ मध्ये ‘युक्रेन रिकव्हरी कॉन्फरन्स’ (Ukraine Recovery Conference) आयोजित करणार आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या पुनर्रचना आणि उभारणीसाठी ही एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद असेल. “युक्रेनची पुनर्रचना हा दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपमधील सर्वात मोठा प्रकल्प असेल. भारत हा जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली देश असल्याने, या पुनर्रचना प्रक्रियेत भारतानेही सहभागी व्हावे,” अशी इच्छा एस्टोनियाने व्यक्त केली आहे. रशिया-युक्रेन वाद संपवण्यासाठी दबाव आणण्याची क्षमता भारताकडे आहे, असेही त्साहकना यांनी स्पष्ट केले.
भारत आणि एस्टोनियामधील हे संबंध अलीकडच्या काळात सातत्याने दृढ होत आहेत. काही महिन्यांपूर्वीच एस्टोनियाचे राष्ट्रपती अलार कारिस यांनी भारतात आयोजित ‘एआय समिट’मध्ये भाग घेतला होता आणि पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. आता पंतप्रधानांच्या संभाव्य एस्टोनिया दौऱ्यामुळे या मैत्रीला अधिक बळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
