सध्या सोशल मीडियावर एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या फोटोंची आणि रिल्सची जोरदार चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणावरून पंतप्रधान मोदींवर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “देशाच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावत असताना आपले पंतप्रधान इटलीत चॉकलेट वाटण्यात आणि रिल्स बनवण्यात मश्गुल आहेत,” अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं? पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. रोम शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांनी एक खास फोटोसेशन केले. एवढ्यावरच न थांबता, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत एक कोलाबोरेशन (Collab) व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी मेलोनी यांच्या नावाशी साधर्म्य असणारे ‘मेलेडी’ (Melody) चॉकलेट त्यांना भेट देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोन्ही नेते मनमोकळेपणाने हसताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
पंतप्रधानांचे हे नेतृत्व नाही तर ‘नौटंकी’ – राहुल गांधी पंतप्रधानांच्या या व्हिडिओवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ट्विटरवर (X) पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, “आर्थिक तुफान डोक्यावर आहे आणि आमचे पंतप्रधान इटलीमध्ये टॉफ्या वाटत आहेत! देशातील शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि लहान व्यापारी डोळ्यात पाणी आणून रडत आहेत; पण पंतप्रधान मात्र हसून रिल्स बनवण्यात व्यग्र आहेत आणि भाजपचे लोक त्यावर टाळ्या वाजवत आहेत. हे नेतृत्व नाही, तर निव्वळ नौटंकी आहे!”
रायबरेलीच्या सभेतूनही डागले तोफगोळे उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील एका जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी थेट भाजप सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांपासून देशात बेरोजगारी सातत्याने वाढत आहे. मी जेव्हा यावर बोलतो, तेव्हा माझी खिल्ली उडवली जाते. आता उद्योगपती अदानी किंवा अंबानी देशाला वाचवू शकत नाहीत. देशाचा विकास फक्त येथील शेतकरी, मजूर आणि तरुणच करू शकतात; पण सरकारने त्यांचेच हात बांधून ठेवले आहेत. सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या जाणीवपूर्वक संपवल्या जात आहेत.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “पंतप्रधानांनी परदेशात जाऊन चॉकलेट वाटण्यापेक्षा देशातील शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा कसा वेळेत होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. अंबानी देशातील तेल बाहेर निर्यात करत आहेत, जे तेल वास्तविक पाहता देशातील जनतेला मिळायला हवे.”
संविधानावरील आक्रमणाचा गंभीर आरोप या सभेत राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. “मोदी आणि शाह हे दोघे मिळून भारताच्या संविधानावर आक्रमण करत आहेत. देशाची संपत्ती अदानी-अंबानींच्या घशात घालणे हे संविधानावरील सर्वात मोठे आक्रमण आहे. देशातील विद्यापीठांमध्ये गुणवत्तेऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीच्या लोकांना कुलगुरुपदी बसवले जात आहे. निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था यांसारख्या स्वायत्त संस्था नष्ट करण्याचा घाट घातला जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
आपल्या भाषणाचा शेवट करताना राहुल गांधी आक्रमकपणे म्हणाले, “संविधानावर आणि देशाच्या लोकशाहीवर अशा प्रकारे आक्रमण करणाऱ्यांना गद्दार म्हणतात. म्हणूनच मी मोदी-शाह यांना गद्दार म्हणतो. मी कोणालाही घाबरत नाही आणि आपल्या भूमिकेसाठी कधीही कोणाची माफी मागणार नाही!”
