हातावर पोट असणाऱ्या स्थानिक लोककलावंतांचा प्रश्न कोरोनाच्या या महामारीच्या संकटात पुन्हा एकदा समोर येऊन ठेपला आहे आहे. एकीकडे पहिल्या लाटेनंतर काही काळाने सर्व स्थिरावले आहे असे वाटत असताना पुन्हा सगळं नव्याने सुरू होत असताना पुन्हा अचानक गोष्टी थांबल्याने लोककलावंतांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता राज्य सरकारने याच अडचणीवर पर्याय शोधून काढला आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये एवढी भयावह परिस्थिती डोळ्यासमोर दिसत असूनही बेफिकीरपणे वागणाऱ्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोककलावंतांच्या कलेचा उपयोग करून घेतला जाणार आहे. त्याबाबतीतला अध्यादेशही काढण्यात आला आहे. या नव्या योजनेसाठी राज्य सरकारने पाच कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.
लोककलेनं नेहमीच लोकरंजनासोबत जनजागृतीचं काम केलं. अनिष्ट रूढी, प्रथांविरोधात लोककलेतून आसूड ओढण्यात आला. कोरोनाच्या लढ्यात आता याच लोककला अत्यंत महत्वाची भूमिका म्हणजेच कोरोनाबद्दलची जनजागृती करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेत, ती निसंकोचपणे बजावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, माहीती व जनसंपर्क आदींनी मिळून याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतले आहेत. या बैठकीला अभिनेता सुबोध भावेही उपस्थित होता.
सुबोध भावेंनी याबद्दल बोलताना सांगितले कि, लोककलावंतासमोर आता चरितार्थ भागवायचा कसा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यावर विचार करताना वापर जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये कोरोनाबाबत जागृतीसाठी या लोककलावंतांचा वापर येईल यावर सर्वांच म्हणणे एकच झालं. त्यानुसार जे कलावंत एकल आहेत ते हे काम योग्य प्रकारे करतील. हा कलाकार आपली कला गावातल्या चावडीपाशी किंवा वाडीतल्या चौकात जाऊन सादर करू शकतो. त्या कलेच्या माध्यमाने तो कोरोनाशी लढताना घ्याव्या लागणाऱ्या काळजीबद्दल स्पष्ट समजेल अशा भाषेमध्ये माहिती सांगेल. प्रशासनाचा एक माणूसही त्याच्यासोबत दिला जाईल. जीआरमध्ये त्याबाबतीच्या सर्व अटी-नियम दिलेल्या आहेत. तसेच ठराविक वेळाही ठरवून दिलेल्या आहेत. यामध्ये तो ही आपली कला दुपारी 4 ते 6 या वेळेतच सादर करेल. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अशा कलावंतांची यादी सुपूर्द केलेली आहे. त्यांची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील पुरवली जाईल. त्यानंतर त्या त्या एकल कलावंतांनी दिलेला विषयावर सादरीकरण करून जागृती करायची आहे.
यासाठी काही कडक निर्बंध घालून दिले आहेत. जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सतत मास्क लावणे, तो योग्य पद्धतीने लावणे, हात धुणे, सॅनिटायझर लावणे, अंतर राखणे आदी अनेक विषयावर यात सादरीकरण करण्यात आले आहेत. लहान मुलांची, वयोवृद्धांची घ्यायची काळजी, सरकारची कोरोनाविषयक असलेली नियमावली आदीं विषय यामध्येघेता येणार आहेत. या एकल कलावंतांसोबत ज्या गावामध्ये हा कार्यक्रम नियोजित असेल, त्या गावचा ग्रामसेवक, शाळेचा मुख्याध्यापक हा सोबत राहील. तसेच कार्यक्रम झाल्यावर तो अधिकारी संबंधित कलाकाराला प्रमाणपत्र देईल. आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे कलाकाराला त्यांच्या मानधनाची मागणी करता येण शक्य होणार आहे.