आज सर्व राज्यांतील सीए, टॅक्स वकील संघटना देखील या बंदला पाठिंबा देणार आहेत. कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल आणि राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतीया यांनी सांगितले की, दिल्लीसह देशभरातील सर्व राज्यातील सुमारे १५०० लहान-मोठ्या कंपन्या शुक्रवारी आंदोलनात सहभागी होणार आहेत. जीएसटी नियमात २२ डिसेंबर आणि त्यानंतर अनेक एकतर्फी दुरुस्ती करण्यात आल्या. ज्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यां मध्ये संतापजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कर अधिकाऱ्यांना या माध्यमातून अमर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. विशेषतः आता व्यापाऱ्याचा एखाद्या कारणावरुन कोणताही अधिकारी कोणत्याही जीएसटी नोंदणी क्रमांक निलंबित करू शकतो. अशा नियमांमुळे केवळ भ्रष्टाचार वाढत नाही तर कोणत्याही व्यावसायिकाला हे अधिकारी त्रास देऊ शकतात, असे ते पुढे म्हणाले.
त्याचप्रकारे स्वत:च्या मनमानी पद्धतीने परदेशी ई-कॉमर्स कंपन्या ई-कॉमर्सच्या कायद्यांचे आणि धोरणांचे उल्लंघन करत आहेत. सरकारने ते थांबवण्यासाठी लवकरच एफडीआय धोरणात नवीन प्रेस नोट जारी करावी आणि ज्या ई-कॉमर्स कंपन्या कायद्याचे उल्लंघन करतात त्यांवर कडक कारवाई केली पाहिजे असे भरतीया आणि खंडेलवाल यांनी म्हटले आहे. आजच्या संपामध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचे बुकिंग आणि माल भरण-उतरवणं, वितरण बंद राहील. सर्व वाहतूकदार संघटनांना निषेध म्हणून भारत बंद असताना आपली वाहनं पार्क करून ठेवण्यास सांगितली गेली आहे. विविध ठिकाणी राज्यात निषेध म्हणून निदर्शनं करण्यात येणार आहेत. त्यामुळे अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागू शकतो.
व्यापार संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने देशात दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, वाढत चाललेले पेट्रोल आणि डिझेलचे दर, वस्तू व सेवा कर, ई-बिल या संदर्भात आज भारत बंद जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील जवळपास ४० हजार व्यापारी संघटनांनी जवळपास ८ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सेवा कर आणि वस्तू करांच्या तरतुदींचा आढावा घेण्याच्या मागणीसाठी हा बंद केला जात आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशनने देखील ई-बिल संपुष्टात आणण्यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या भारत बंदला ठाम पाठिंबा दर्शविला आहे. कॅट यांनी एका निवेदनात असे म्हटले आहे कि, शुक्रवारी देशभरातील सर्व वाहतूक कंपन्या बंद राहतील. याशिवाय महिला उद्योजक, उद्योजक, लघु उद्योगांचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय संघटना, फेरीवाले, व व्यापाराशी संबंधित इतर क्षेत्रही या व्यापारी बंदामध्ये सहभागी होणार आहेत.
या बंदमध्ये देशातील काही ठराविक सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहे. भारत बंदमध्ये देशातील चाळीस हजारापेक्षा जास्त व्यापारी संघटना सहभागी होणार असल्यामुळे बहुतांश बाजारपेठा बंद राहतील. मोठ्या संख्येने राष्ट्रीय व्यापार संघटनांसह परिवहन क्षेत्रानेही या बंदला अभूतपूर्व पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये , नॉर्थ इंडिया स्पाईसिस ट्रेडर्स असोसिएशन, ऑल इंडिया वूमेन एंटेरप्रेनियर्स असोसिएशन, ऑल इंडिया FMCG डिस्ट्रिब्यूटर्स फेडरेशन, फेडरेशन ऑफ अॅल्यूमीनियम यूटेंसिल्स मॅन्यूफॅक्चरर्स एंड ट्रेडर्स एसोसिएशन, ऑल इंडिया कॉस्मेटिक मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया कम्प्यूटर डीलर असोसिएशन आदींचा सह्भाग आहे. तर भाईचारा ऑल इंडिया ट्रक ऑपरेटर वेलफेअर असोसिएशन आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस या विरोध प्रदर्शनात सामिल होणार नाही आहेत. देशातील अनेक विभागांमध्ये वाहतूक सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता वर्तावली जात आहे. सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत आपल्या गाड्या पार्क करण्याचे आवाहन AITWA ने वाहतूक कंपन्यांना केले आहे. बुकिंग आणि बिलासंदर्भातील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.
सीए आणि टॅक्स अॅडव्होकेट संघटनांनीही भारत बंदला समर्थन दिले आहे. त्यामुळे या सेवांवर काही विपरीत परिणाम होणार आहे. महिला उद्योग गट, फेरीवाले आणि अन्य लहान व्यापारीही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. जीएसटीमधील त्रुटींचा विरोध म्हणून आज कोणताही व्यापारी पोर्टलवर लॉग इन करणार नाही आहे. बंद दरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा, मेडिकल, दूध आणि भाजी-पाल्यांचा पुरवठा सुरळीत राहणार आहे.