देशभरात कोरोना व्हायरस महामारीचा उद्रेक सुरू आहे. रोज किमान २ लाखाहून अधिक नवीन संक्रमित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. याचं पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारने पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणारी चारधाम यात्रा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी डेहरादून येथे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पत्रकारांशी संवाद साधून याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या मोठ्या प्रमाणातील प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यंदा चारधाम तिर्थयात्रा आयोजन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे चारधाम यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. जरी तीर्थयात्रा स्थगित केली गेली असली तरी, हिमालयीन तिर्थक्षेत्रांचे कपाट ठरलेल्या तारखेनुसारचं उघडण्यात येतील. तसेच मंदिराचे दैनंदिन कामकाज जसे पुरोहित वर्ग नियमित पूजा करतील, त्यामध्ये काही अडचण येणार नाही असे रावत यांनी म्हटले आहे.
कोरोना संसर्गाचा मोठा परिणाम देशातील इतर राज्यांप्रमाणे उत्तराखंडमध्येही दिसून येत आहे. गेल्या 24 तासामध्ये उत्तराखंडमध्ये 6 हजारपेक्षा अधिक कोरोन संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. यावर्षी 14 मेला अक्षय तृतीयाच्या पवित्र मुहूर्तावर उत्तर काशी जिल्ह्यामधील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे कपाट उघडण्यात येणार आहे. तसेच 17 मे रोजी रुद्र प्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ मंदिराचे कपाट आणि 18 मेला बद्रीनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींमध्ये बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भावाचा पसरत चाललेला विळखा पाहता, उत्तराखंड शासनाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय योग्यच ठरला आहे. मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कोरोना संकटामुळे चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी चार तीर्थ मंदिरांमध्ये फक्त त्या मंदिराचे ठराविक पुजारी पुजा आणि इतर धार्मिक विधी करतील, इतर कोणालाही मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अशी स्पष्ट माहिती त्यांनी दिली. तसेच आज या संदर्भीय एक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. या बैठकीत कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन एकत्रित हा निर्णय घेण्यात आला. पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेच्या सभागृहात पार पडली. केदारनाथ, गंगोत्री बद्रीनाथ, आणि यमुनोत्री या चार ठिकाणच्या मंदिरातले पुजार्यानाच फक्त तेथील पूजा अर्चा आणि इतर धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुढच्या महिन्याच्या 14 तारखेपासून या यात्रेला आरंभ होणार होता. चारधाम यात्रा उत्तराखंड सरकारच्या अर्थकारणाचा कणा मानली जाते. परंतु, कोरोनामुळे या सरकारचे आर्थिक स्थिती सुद्धा गडबडणार आहे.
ही यात्रा कुंभमेळ्याप्रमाणे आणखी एक कोरोन सुपरस्प्रेडर ठरत कामा नये, यासाठी सरकारने वेळीच चारधाम यात्रेसाठी प्रमाणित दिशानिर्देश जारी करावेत, असे न्यायालयाने म्हटले होते. राज्य सरकारने वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवून ब्रेक द चेनच्या कडक निर्बंधाप्रमाणे पालन करून लोकांचे जीव वाचवण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी सूचनाही सरकारला न्यायालयाने केली आहे.