अभिनेत्री अनुष्का शर्मावर तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पती विराट कोहलीनंही खास गिफ्ट देऊन तिला सरप्राइज केलं आहे. विराटनं अनुष्कासाठी एक सरप्राइज केक मागवला असून त्यानंतर हा केक कट करून अनुष्काला भरवला आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. सोढाल मिडीयावर विराटनं केक भरवतानाचा फोटो ट्विट केला होता. त्यावर कॅप्शन हॅपी बर्थ डे माय लव्ह, नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन असलेली आणि मला माहित असेलेली प्रामाणिक व्यक्ती, आय लव्ह यू अनुष्का असं दिले आहे. अनुष्काला विराटनं दिलेलं सरप्राइज नक्कीच पसंतीस उतरले असणार यामध्ये काही शंकाच नाही.
अनुष्का शर्मा हिनं प्रत्येक वेळी अभिनेत्री, चित्रपट निर्माती, मॉडेल, पत्नी, आई आणि एक खास मैत्रीण अशा अनेक रुपांमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदारी चोखपणे निभावल्या आहेत. चित्रपट विश्वातील कारकिर्दी सोबतचं अनुष्कानं तिच्या खासगी जीवनालाही कायम प्राधान्य देऊन प्रथम स्थानी ठेवलं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने अशा या अभिनेत्रीवर सर्व स्तरातून अनेकजण शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर तिची अनेक वेगवेगळी छायाचित्र तसेच तिच्या जीवनातील काही खास क्षणांची छायाचित्रे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
happy birthday to this adorable babie 💛#HappyBirthdayAnushkaSharma@AnushkaSharma pic.twitter.com/al17OrRB8D
— tiny anushka archive (@pocketnoosh) April 30, 2021
अनुष्काच्या आयुष्यातील विशेष क्षणांपैकी एक असलेला म्हणजे तिचा आणि विराटचा विवाहसोहळा. क्रिकेट विश्वामध्ये आपली आगळी वेगळी तसेच एक दमदार कर्तुत्ववान कप्तान म्हणून ओळख निर्माण करत, आंतराष्ट्रीय स्तरावरही नावाजलेल्या विराट कोहली याच्याशी लग्नगाठ बांधून अनुष्कानं सहजीवनाच्या प्रवासाला सुरुवात केली. इटलीमध्ये अतिशय खासगीमध्ये या दोघांनीही एका नव्या जीवन प्रवासाची सुरुवात केली. या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले. त्यामध्ये लग्नातील तिचा आणि विराटचा लुक अतिशय सुंदर होता. दोघांना एकदम साजेसा.
जीवनात आपल्या पसंतीच्या जोडीदाराच्या होणारया आगमनाने आनंद, त्यातही ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीसोबत एका नव्या आयुष्याला प्रारंभ करतानाचं कुतूहल, उत्सुकता आणि काहीसं दडपण विराट आणि अनुष्काच्या चेहऱ्यावर दिसत होते, आणि हे व्हिडीओ पाहताना नक्कीच लक्षात येतं. माय वाईफ, माझी पत्नी असं म्हणत विराटनं अनुष्काचा पहिल्यांदाच उल्लेख केला तेव्हाचा क्षण दोघांसाठीही खूपच रोमहर्षक ठरणारा होता. काल परवापर्यंत मी एक लहान मुलगा होतो आणि आता थेट माझी पत्नी…असं म्हणताना विराटच्या चेहऱ्यावरील आणि त्याच्या मनातील भाव खूप काही सांगून जातात. अनुष्कावर अगदी जीवापाड प्रेम करणाऱ्या विराटने तिच्याबद्दलच्या असलेल्या आपल्या भावनांना कायमच मोकळी वाट करुन दिली आहे. तर, अनुष्कानेही त्याच्या कारकिर्दीतील चढ उतारामध्येही खंबीरपणे एक आदर्श पत्नी, मैत्रीण म्हणून त्याची साथ दिली आहे आणि या गोष्टी वेळोवेळी समोर येताच राहिल्या आहेत. म्हणूनच विरुष्काची ही जोडी कायमच सर्वांच्या पसंतीची उतरत आहे.