भारतामध्ये विविध प्रकारांमध्ये नारळाचा किंवा खोबऱ्यापासून काढलेल्या तेलाचे फायदे आहेत. आयुर्वेदातही त्याचा विशेष उल्लेख केला गेलेला आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते त्याच बरोबर रंग उजळण्या साठीही मदत करतं. खोबऱ्याच्या तेल हे नैसर्गिक असल्या कारणाने त्याचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर शारिरीक व्याधी, त्वचेच्या, केसांच्या समस्या, सांधेदुखी सारख्या दुखण्यांवर सुद्धा होतो. परंतु, हे खोबर्याचे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे असावे. आपल्याकडील वाळवलेले खोबरे घाण्यावर देऊन कोणतीही रासायनिक प्रक्रिया केल्याविना काढलेले तेल शरीरास सर्वांत उत्तम.
खोबऱ्याच्या तेलाने लहान मुलांना मालिश केली जाते , जेणेकरून मुलांची त्वचा सुधारून, हाडे सुद्धा मजबूत व्हायला मदत होते. ओठ गुलाबी होण्यासाठीही फायदा होतो. त्यामुळे नियमितपणे खोबऱ्याच्या तेलाचा वापर त्वचा आणि ओठांसाठीही फायदेशीर ठरतो. त्याचप्रमाणे खोबऱ्याचं तेल केसांची निगा राखण्यासाठी खूप उपयोगी पडते. केस घनदाट, लांब आणि चमकदार करण्यासाठी खोबऱ्याचं तेलं अत्यंत गुणकारी असतं. खोबऱ्याच्या तेलाने आंघोळी आधी केसांना १० मिनिट्स आधी मसाज केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. त्याचप्रमाणे केसांच्या मुळांशी केस धुवायच्या आधी १० मिनिटे मालिश केल्याने केसांची मूळ मजबूत होऊन, केसांची वाढ चांगल्या प्रकारे होते व केसांमधील कोंड्याची समस्या दूर होते, त्याचप्रमाणे ५ मिनिटांसाठी डोक्याला मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.
आयुर्वेदातही खोबर्याच्या तेलाला अनन्य साधारण महत्व आहे. खोबऱ्याच्या तेलाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. शरीराला आलेली सूज, मुख्यत्वे करून कोणत्याही प्रकारच्या सांधेदुखीवर उपाय म्हणून खोबऱ्याच्या तेलाचा वापर करण्यात येतो. खोबऱ्याच्या तेलाचा वापर वजन कमी करण्यासाठीही करण्यात येतो. प्रतिदिन सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण शरिराला खोबरेल तेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. सारखी खोकल्याची उबळ येणे, खोकून दम लागणे यांसारख्या विकारांमध्ये खोबरेल तेल दिवसातून २-३ वेळा १-२ चमचे प्यावे. यामुळे खोकल्याची उबळ लगेच थांबते. ज्यांना झोप येत नाही, अशा व्यक्तींनी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाचा वापर अवश्य करावा.