देशातील कोरोना लढाईमध्ये जसे डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय स्टाफ सक्रीय आहेत, त्याचप्रमाणे आत्ता अगदी कलाकारांपासून ते खेळाडू आपापल्या परिने मदत करत आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकरही मदतीसाठी सरसावला आहे. देशामध्ये सदय स्थितीला ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यासाठी सचिनने पुढाकार घेऊन त्याने यासाठी मोठे दान केल्याचेही वृत्त ऐकायला मिळाले आहे. देशातील ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू पाहून, काही युवा उद्योजक आता रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. या युवा उद्योजकांना मिशन ऑक्सिजनसाठी पैशांची पुरेशी मदत मिळत नव्हती, पण सचिन तेंडुलकर त्यांच्या मदतीला वेळेवर धावून गेल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण सचिनने या मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपये दिल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता कोरोना महामारीच्या लढ्यात आता सचिन पुढे आलेला पाहायला मिळाले आहे.
सचिन काही दिवसांपूर्वी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याचे आपण बघितले. सचिन हा मागील काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी क्रिकेट सीरिजमध्ये खेळला असून, ही स्पर्धा भारताने जिंकली होती, पण ही स्पर्धा संपवून घरी आल्यानंतर सचिनप्रमाणे अजूनही त्या सामन्यात खेळणारे खेळाडूना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर हॉस्पिटल मध्ये दाखल होऊन सचिनने कोरोनावर उपचार घेतले होते आणि त्याने कोरोनावर मात केल्याचे पाहायला मिळाले. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे कोण प्लाझ्मा दान करायलाही पुढे सरसावत नाही, परंतु, सचिनने त्याच्या वाढदिवशी प्लाझ्मादेखील दान करून जनतेसमोर आदर्श ठेवला, आणि इतरानंही प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले.
सचिनने याबाबत आपला एक व्हिडीओ शेअर केला होता. सचिनने आपल्या या व्हिडीओमध्ये आपला कोरोनाचा अनुभव आणि समाजासाठी एक विनंती केली आहे. काही दिवसांपूर्वी मी कोरोना संक्रमित झालो होती, पण त्यावर योग्य उपचार पद्धती अवलंबून मी मात केली आहे. घरी आल्यावर सुद्धा मी २१ दिवस विलगीकरणा मध्ये राहिलो होतो आणि त्यावेळी मला नक्कीच तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा फायदा झाला. त्याच बरोबर डॉक्टरांनीही माझ्यावर योग्य उपचार केले असून, डॉक्टरांनी मला प्लाझ्मा डोनेट करण्याची विनंती केली आणि तिच गोष्ट मी आत्ता माझ्या वाढदिवसाच्या दिवशी करणार आहे. मी आता प्लाझ्मा देणार असून, जे कोरोनातून बरे होऊन ३ महिने झाले असतील अशा सर्वांनी दुसर्यांचा जीव वाचविण्यासाठी प्लाझ्मा दान करायला हवा. कारण जर कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत प्लाझ्मा मिळाला तर त्यांच्या प्रकृतीमध्ये नक्कीच सुधारणा घडून होऊ शकते. त्यामुळे प्लाझ्मा दान करणे सद्य स्थितीमध्ये फार महत्वाचे आहे. समाजाच्या उपयोगासाठी मी ही गोष्ट करणार असून तुम्हीही ही गोष्ट करायला पुढे येणे गरजेचे आहे, अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे.