चालणे हा व्यायामातील सर्वोत्तम प्रकार आहे. कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. रोज पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम निरोगी राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकावेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्य़स्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे बरेचदा दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ व्यायामासाठी देणे फार गरजेचे असते. जर तुम्ही रोज ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता भासत नाही. शहरी भागात सकाळी एक फेरफटका मारला तर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. इतकंच नाही तर लहान मोठ्या सोसायटीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर अनेकजण शतपावली करताना दिसतात. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे हे जवळपास विसरूनच गेलो आहोत. त्यामुळे काही पाऊले चाललो, तरी अनेकदा धाप लागते. लक्षात ठेवा असे होत असल्यास, हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे. त्यामुळे चालायची संधी मिळाली तर सोडू नका.
आता तर एखादी व्यक्ती दररोज किती पावलं चालते, हे मोजण्यासाठीही वेगवेगळी यंत्र आली आहेत. यात स्मार्ट घड्याळी आहेत, पेडोमीटर आहेत, मोबाईलमध्ये अॅप आलेले आहेत. चालण्याने होणारे आहेत ते फायदेच आहेत, नुकसान एकही नाही. एकही पैसा खर्च न करता येणारा व्यायाम प्रकार, कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार, शरीर सुदृढ, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार, सकाळी चालण्यामुळे शरीराला मिळणारा सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा पुरवठा, हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ड’ जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते, चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो, सतत काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो, चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत, चालण्यामुळे झोपही चांगली लागते. या धकाधकीच्या अगदी घडाळ्याच्या काट्यावर चालणार्या आयुष्यात एकाग्रता आणि चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
कोरोनाच्या काळात तर लॉकडाऊन मुळे घरात बसून वाढलेले वजन वजन कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार सर्वात उत्तम आहे. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते तसेच दररोज एक तास चालल्यास संधीवाताचा त्रासही कमी होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.