देशामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संख्येमुळे हरिद्वारमधील कुंभामेळ्यातील भाविकांच्या होणार्या अलोट गर्दीमुळे चिंतेत भर पडली आहे. एक एप्रिलपासून सुरु झालेल्या कुंभात पहिल्या दिवशी सुमारे दोन लाख लोकांची उपस्थिती होती. त्यानंतर दररोज सरासरी ५० हजार भाविक स्थानासाठी येतचं आहेत. अशीच गर्दी जर कायम राहिली तर हरिद्वारमधील कुंभ कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकते. त्यामुळे नियोजित काळाच्या आधीच हा मेळा संपवावा, असा इशारा केंद्र सरकारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला. कोरोना संसर्गापासून बचावासाठी मेळा प्रशासन व सरकारच्या दिशा-निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जात असले तरी, कोरोनाच्या सद्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी सचिव स्तरावरील बैठकीत वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्याने कुंभादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकून, कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरविण्यामध्ये कुंभमेळा निमित्त ठरू शकते, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
हरिद्वार कुंभमेळाव्याचा कालावधी हा ३० एप्रिलपर्यंत असणार आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांमध्ये हरिद्वारमध्ये एकूण ३४९ नवीन संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. सरकार त्यासाठी एक टीम तयार करत आहे. शासनाने दिलेल्या कडक नियमावलीचे पालन भाविकांनी करणे अनिवार्य आहे. कुंभ तीर्थ यात्रेकरूंनी मास्क घालावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासाठी मदत म्हणून साधू-संत, धर्मगुरूंचीही मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या मदतीने जनतेला आवाहन केले जाईल. मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार कुंभमेळा वेळेच्या आधीचं समाप्त करण्याचा विचार करत आहे. नियमांबाबत बेपर्वाई दिसून येते. जनतेमध्ये निष्कारण भीती पसरू नये यासाठी जनजागृती मोहिम राबवली जाणार आहे. नैनिताल उच्च न्यायालयाने देखील कोरोना महामारीच्या संकटाचा विचार करून डेहराडून आणि हरिद्वार जिल्हा कोर्ट व कुटुंब न्यायालय दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अत्यावश्यक प्रकरणांची मात्र सुनावणी करण्यात येणार आहे. तसेच कोर्टाचे सर्व कर्मचार्यांपैकी फक्त ३० टक्के कर्मचारी कामावर उपस्थित राहतील.
कुंभात सहभागी होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे अनिवार्य केले आहे. हरिद्वार, ऋषिकेश आणि देवप्रयाग हे तिन्ही भाग कुंभ क्षेत्रामध्ये येतात. तर कुंभामध्ये प्रवेश करण्यासाठी सात प्रवेशद्वारांचा वापर करता येईल. प्रत्येक प्रवेशद्वारावर अँटिजन टेस्ट व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली गेली आहे. एखाद्या वाहनातील यात्रेकरूमध्ये अँटिजन टेस्ट दरम्यान एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला तर संपूर्ण वाहनालाचं माघारी धाडण्यात येत आहे. सोमवारी पूर्व यूपीतून आलेल्या बस भगवानपूर एंट्री पॉइंट येथून परत धाडण्यात आल्या. गंगा घाटावर प्रवेशापूर्वी निगेटिव्ह चाचणी अहवाल दाखवणे अनिवार्य आहे. तसेच तेथेही अँटिजन तपासणी केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही.