महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू संक्रमणाची दुसरी लाट आली आहे. या संक्रमणाचा वेगही जास्त असल्याने, राज्यात दररोज 60 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यात कालपासून ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध अजून कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. आणि जर काही कारणासाठी आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर पूर्वीप्रमाणे ई-पास काढणं अनिवार्य केलं गेलं आहे. परंतु, अजूनही काही जनतेमध्ये इ-पास बद्दल शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत.
ई-पास कसा काढायचा
महाराष्ट्रामध्ये ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट देऊन, नंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना लक्ष देऊन वाचून घेणे. सर्व सूचना वाचून झाल्यानंतर ई-पास साठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करणे आणि नेक्स्ट किंवा पुढे जा वर क्लिक करणे. महाराष्ट्राबाहेर कोठे जायचं आहे यावर क्लिक करणे.
प्रथम जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडून, स्वत:चे पूर्ण नाव नोंद करायाचे, प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत आणि कुठल्या भागामध्ये करणार ते नमूद करायचे. मोबाईल नंबर, कोणत्या कारणासाठी प्रवास करत आहात ते कारण व प्रवासाचा उद्देश सविस्तरपणे नोंद करायचे. कोणत्या वाहनाने जाणार आहत, वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, स्वत:चा सध्याचा पत्ता आणि ई-मेल आयडी नोंद करायचे, प्रवास जिथून सुरु करणार ते ठिकाण, प्रवासाचे शेवटचे ठिकाण, तसेच एकटे अथवा समूह असेल तर सहप्रवाशांची संख्या देखील नमूद करावी. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे वेगवेगळे झोन केले गेले आहेत. त्यामध्ये तुम्ही कटेंन्टमेंट झोनमधील आहोत का? याविषयी माहिती नोंद करायाची. परतीचा प्रवास किती दिवसांनी असेल, तसेच तो याच मार्गानं असणार का हे नमूद करावे लागते. सर्वात शेवटी 200 केबी साईझ पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करून सर्व माहिती चेक करुन अर्ज सबमिट करायचा. त्यानंतर टोकन मिळेल, टोकन नंबर सेव्ह करुन ठेवायचा, त्या नंबर वरून इ-पास साठी केलेल्या अर्जाचा स्टेटस कळायला मदत होईल.
तसेच जे कर्मचारी राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीमधील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्यांमध्ये येतात, त्यांना आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची आवश्यक भासणार नाही. आवश्यकता पाहूनच ई-पास मंजूर करण्यात येणार आहे. त्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे उपायुक्त यांच्याकडे राखीव ठेवले आहेत. वैयक्तिक किंवा काही ठराविक व्यक्तींचा समूह सुद्धा अर्ज करु शकतो. सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करा. अर्ज सादर केल्यानंतर ई-पास डिजीटल आणि त्यांची हार्ड कॉपी प्रवासादरम्यान सोबत बाळगावी. तसेच ई-पासचा गैरवापर हा कायद्याने गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.