मुंबईसह संपूर्ण राज्यत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे रुग्णांच्या उपचारासाठी बेड्सची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं एक ठोस पाऊल उचललं आहे. यापुढे कोरोना रुग्णांसाठी काही खाजगी रुग्णालयांमध्ये बेड्स राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्या रुग्णांना आयसीयू बेड्सची गरज नाही, त्यांना सशुल्क हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या स्टेप डाऊन सुविधेसाठी दिवसाला 4 ते 6 हजारांपर्यंत शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.
जगासह संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात अडकले असताना मुंबईमध्ये कोरोना संक्रमणामुळे अक्षरशः तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पूर्वनियोजन म्हणून मुंबई महापालिका आयुक्तांमार्फत महापालिकेचा पर्यायी अॅक्शन प्लॉन तयार ठेवण्यात आला आहे. मुंबईत आरोग्य सुविधेवर खूपच ताण पडत आहे. त्यातच सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी खासगी रुग्णालयांमध्ये बेड अडवून ठेवलेले आहेत. म्हणूनच या सगळ्यावर दुसरा पर्याय म्हणून मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता केवळ आवश्यकता असणारऱ्या रुग्णांनाच आयसीयू बेड उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तर ज्या रुग्णांना आयसीयू बेड्सची गरज नाही, त्यांना सशुल्क हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था करून दिली जाणार आहे. यासाठी खाजगी हॉस्पिटल्सची मदत घेतली जाणार आहे. शासकीय रुग्णालयाबद्दल कायम नकारात्मकता ऐकलेली असल्याने रुग्ण त्रास झाल्यावर शासकीय रुग्णालयामध्ये भारती न होता खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भारती होतात. काही रुग्ण गरज नसतानाही बेड अडवून धरतात. महापालिकेने त्यासाठी खाजगी रुग्णालय आणि खाजगी हॉटेल्सचे टायअप करुन दिलं आहे. आता रुग्णांना स्टेप डाऊन नावाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ज्या रुग्णांना आयसीयू बेडची गरज नसते, त्या रुग्णांसाठी या सुविधेचा वापर करण्यात येणार आहे. काही वेळा कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी कमी झाली तर त्यांना त्वरित उपचाराची गरज निर्माण होते, परंतु, अनेकदा अशी वेळ असते कि रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असूनसुद्धा उपचारासाठी बेड उपलब्ध नसतो. रात्रीच्या वेळेस तर बेड मिळवताना रुग्णांना प्रचंड त्रास सोसावा लागतो.
महापालिकेने हा लोकांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी म्हणून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या 24 वॉर्डामधील वॉर रूम व जम्बो फिल्ड हॉस्पिटलचे काम हे नोडल अधिकारी पाहतील. विशेषकरून रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेमध्ये रुग्णांना लवकरात लवकर बेड कसा उपलब्ध होईल हे पाहण्याची जबाबदारी पूर्णता: या नोडल अधिकाऱ्यांवर सोपविलेली असते. या अधिकाऱ्यांची शिफ्ट दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा दोन प्रकारामध्ये असते. हे नोडल अधिकारी शिफ्ट बदलताना सुद्द्धा एकमेकांना सर्व माहिती पुरवून आणि गरजेच्या वेळेस संपर्कात राहून रुग्णांच्या बेडची व्यवस्था करून रुग्णांना साहाय्य करतील, असं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.