मागील ८ महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने घातलेला धुमाकूळ पाहता, दिवाळीच्या सणवरही कोरोनाचे सावट होतेच. कोरोन काळामध्ये संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सर्वत्र बंद असल्याने, त्याप्रमाणेच बर्याच जणांच्या नोकर्या गेल्याने, कामधंदे ठप्प झाल्याने, यंदाची दिवाळी साजरी कशी करायची असा सर्वसामान्यांना भेडसावणारा प्रश्न निर्माण झाला. परंतु कोरोना चा प्रादुर्भाव काही प्रमाणत कमी झाल्याने दिवाळीच्या हंगामामध्ये देशभरातील बाजारपेठेला चांगलीच चालना मिळाली आहे. लोकांनी मागील आठ महिन्यात लॉकडाऊन असल्याने फक्त जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर काहीही खरेदी केलेली नाही. त्यामुळे होणारा काही प्रमाणातला वायफळ खर्च आटोक्यात आल्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पैसे शिल्लक होते. त्यापैकी काही भाग त्यांनी दिवाळीच्या सणासाठी खर्च करता आला.
बाजारातील विक्रीमध्ये साधारणपणे १० टक्क्यांची वाढ झालेली दिसून आली. यंदा पहिल्यांदाच दिवाळीला मोठ्या संख्येने स्थानिक मूर्तीकार ,कामगार, हस्तशिल्पकार आणि विशेषत: कुंभारांनी बनवलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळाली आहे. दिवाळीच्या सणाला बाजारात झालेली जबरदस्त विक्री भविष्यात स्थानिक बाजारपेठेसाठी तसेच व्यापाराच्या दृष्टीने चांगले संकेत देतात. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसं समाधानाच वातावरण दिसून आले. दिवाळीच्या विक्री मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं, स्वयंपाकघरातील वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, खेळणी, विजेची उपकरणे आणि भेटवस्तू, मिठाई, घराच्या सजावटीच्या वस्तू, भांडी, दागिने, फर्निचर, इत्यादी सर्वाधिक खरेदी केलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे. कपडे, होम डेकोरेशनच्या वस्तूंनाही ऑनलाईन मोठ्या प्रमाणात मागणी आहे. वेगवेगळ्या कंपन्यानी दिलेल्या स्कीम्समुळे ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी विक्रीलाही मोठ्या प्रमाणात पसंती दिली. यावर्षी दिवाळीला बाजारपेठेत विक्रीची सुमारे ७२ हजार कोटी रुपयांची विक्रमी नोंद झाली आहे. आणि यंदा चिनी वस्तूंवर घालण्यात आलेली बंदी त्यामुळे चीनी उत्पादनाची विक्री कमी झाल्याने चीनला थेट ४० हजार कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे.
भारत-चीन सीमेदरम्यान गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये झालेल्या हिंसक लढाई सीएआयटी संस्थेने चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन सर्व भारतवासियांना केले. आणि यंदाच्या दिवाळी सणला त्याचा चांगला परिणाम बाजारपेठेत दिसून आला. सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया आणि राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा सर्व चिनी उत्पादनंवर बहिष्कार घालून भारतीयांनी दिवाळी साजरी करण्याच्या कॅटच्या अभियानला देशभारातून भरभरून पाठिंबा मिळाला आहे.. देशाचे व्यापारी आणि लोकांनी चिनी वस्तू खरेदी करण्याकडे पूर्णतः पाठ फिरवल्याने चीनला ४० हजार कोटीचा जबरदस्त झटका मिळाला. भारतीयांकडून चीनसाठी हा एक प्रकारचा संदेशचं आहे की, त्यांनी भारताला डम्पिंग यार्ड समजू नये.