भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुधारण्याच्या दिशेने अनेक पातळ्यांवर सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. तब्बल अडीच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीमध्ये आले असून मंगळवारी स्थायी आयोगाची सिंधू नदीच्या जलवाटपावर दोन दिवसाची बैठक सुरू झाली. भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीमुळे कदाचित दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
बालाकोट एअरस्ट्राइकनंतर पुलवामा हल्ल्याला केलेल्या प्रत्युत्तरादाखल दोन्ही देशांमध्ये होणारी ही पहिलीच बैठक आहे. एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले कि, अजून पाइपलाइनमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पाकच्या पब्बी भागात शांघाय सहकार्य संघटनेच्या बॅनरखाली दहशतवादविरोधी युद्धसरावाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतीय लष्कराचाही सहभागी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि याबद्दल अद्याप शासकीयरित्या घोषणा झाली नसली तरी भारत यामधून काही झाले तरी माघार घेणार नाही. कारण, रशियाच्या दृष्टीने एससीओ हा एक प्रतिष्ठेचा विषय आहे त्यामुळे मास्कोची नाराजी पत्करणे भारताला मान्य नाही. म्हणूनच प्रथमच भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मैत्रीपूर्ण युद्धसरावात सहभागी होणार आहेत. यूएई आणि सौदी अरेबियाने भारत-पाकिस्तान मधील बिघडलेले संबंध पुन्हा मार्गावर यावेत म्हणून मुख्य भूमिका बजावली आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी मौन बाळगून असले तरी तसे संकेत ते देत आहेत.
हार्ट एशिया परिषद ३० मार्चला ताजिकिस्तानची राजधानी दुशानबे मध्ये आयोजित आहे. भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये ही प्रगती अचानक घडून आलेली नाही तर त्यासाठी मोठी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हार्ट एशिया परिषदेमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी सहभागी होणार असून त्या दोघामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत पाकिस्तान संबंधांबाबत सुरू झालेल्या सकारात्मक हालचालींमध्ये अजूनही अनेक अडथळे आहेत. या आगामी काळामध्ये पाकिस्तानात नेतृत्व आणि त्याहून अधिक लष्कराची अग्निपरीक्षा असणार आहे. पूर्वानुभवांवरून आपण अवलोकन केले आहे की, नेमक अशा वेळी पाकिस्तान काहीतरी कुरापती करतो, परंतु लष्कराचा दहशतवादाला आपल्या सरकारी रणनीतीचा भाग म्हणून वापरण्याचा मोह सुटत नाही. यामुळेच दोन्ही देशांतील संबंध बिघडून असंतोष पसरतो. तरीही पाकिस्तानांतील एका भागात जाऊन भारतीय लष्कर युद्धसराव करत असेल तर हा नक्कीच ऐतिहासिक घटना मानली पाहिजे. त्यामुळे आता पाकिस्तानला तेथील आयएसआयच्या कारवायांना तसेच सक्रिय दहशतवादी गटांना काहीही करून लगाम घालावा लागेलचं.
दोन्ही देशांतील लष्कराच्या महासंचालकांनी २५ फेब्रुवारीला हॉटलाइनवर चर्चा केलेली. चर्चेमध्ये सीमेवर युद्धबंदी पाळू, असे ठरले आहे. तेव्हापासून दोन्ही बाजूंनी शांतता पाहण्यात येत आहे. यापूर्वी युद्धबंदीचे १ ते २५ फेब्रुवारी पर्यंत तब्बल २२५ वेळा उल्लंघन करण्यात आले होते. तर जानेवारीमध्ये सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून ३३६ वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले गेले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा सध्या अगदी नरमाईची भूमिका घेऊन वक्तव्ये करत आहेत. मागच्याच आठवड्यात इम्रान खानना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समजताच लगेच नरेंद्र मोदींनी त्यांची फोन करून विचारपूस केली. विशेषत: भारतामध्ये पाच राज्यांमध्ये निवडणूकीचे रणशिंग फुंकले असताना सुद्धा भारतीय नेत्यांनी ना पाक, ना बलुचिस्तानबाबत एक अर्वाच्च काढलेला नाही. मंगळवारी दिल्ली स्थित पाक वकिलातीमध्ये पाकिस्तान दिन साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान यांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पाकच्या प्रभारी उच्चायुक्तांनी येथे नव्या नियुक्त्यांचे संकेत दिले आहेत.