जगभरामध्ये प्रत्येक वर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा नृत्य दिवस मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जातो. पण गेल्यावर्षी पासून सुरु झालेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस साजरा करण्यावर अनेक निर्बंध घालण्यात बंधने आले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी व्हर्चुअल पद्धतीच्या माध्यमाने हा दिवस साजरा केला जातो आहे.
नृत्य हे केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच भाग नव्हे तर काही जणांसाठी नृत्य हे स्ट्रेस बस्टर सुद्धा असते. जगात विविध प्रकारच्या संस्कृती अआहेत, त्यांच्या नृत्य प्रकारावरून त्या संस्कृतीचा अंदाज बांधता येतो. नृत्य हे मानवाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध प्रकारच्या भावनाना वाट करून देण्याच हे एक उत्तम माध्यम आहे. मनुष्य जीवनातील असलेले नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाट्य संस्थाने हा दिवस जगामध्ये साजरा करायला सुरुवात केली. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन ही युनेस्कोची कला प्रदर्शनासाठी भागिदार संस्था आहे. जगभरातील अनेक प्रसिद्ध डान्सर्स आणि कोरियोग्राफर्स या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेने आधुनिक बेले डान्सचा निर्माता समजले जाणारे जॉर्जेस नोवेर यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं.
जगभर हा दिवस सर्व देशांच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक सीमा पार पाडून नृत्य करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नृत्य ही एक जगातील विविध भागांना त्यांच्या नृत्य प्रकाराने जोडणारी एक भाषा आहे. त्यामुळे फक्त नृत्यकलेच्या माध्यमातून एक सकारात्मक किंवा अर्थपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. नृत्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. अगदी लहान लहान प्रदेशापासून वेगवेगळ्या संस्कृतीची वेगवेगळी नृत्य कला असते. पाहूया काही प्रकार थोडक्यात.
बेली डान्स या प्रकाराबद्दल माहिती पाहूया. युरोपमधील लेखक आणि चित्रकारांनी या नृत्य करणाऱ्या जिप्सी महिलांची चित्रे काढल्याने हा नृत्यप्रकाराला युरोपभर लोकप्रियता मिळाली. भटक्या लोकांप्रमाणे बेली डान्सर्सचा एक समूह असायचा, आणि ते फिरतीवर असताना नृत्य करायचे. हा बेली डान्स पाठीचा कणा ताठ ठेवून, कंबरेची जलद गतीने हालचाल करून, त्यासोबतच संपूर्ण शरीर एका लयबद्ध ठेक्यामध्ये हलवणे, अशा प्रकारे करण्यात येणारा बेली डान्स मान आणि पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तसेच हृदयाचं स्पंदन होण्यासाठी, आरोग्य उत्तम राखण्यासाठी हा नृत्यप्रकार अनेक कलाकार व्यवस्थित शिकून घेतात. या नृत्याने एका तासात साधारण ३०० ते ५०० कॅलरीज जाळल्या जातात.
दुसरा प्रकार आहे हिप हॉप. यामध्ये १९७० मध्ये समोर आलेल्या हिप हॉप या नृत्यप्रकारात ‘अपरॉक’, ‘ब्रेकिंग’ आणि ‘फंक स्टाइल्स’ या प्रकारांचाही समावेश करण्यात येतो. जमैकन- अमेरिकन डीजे कूल हर्क याला हिप हॉप म्युझिकचा संस्थापक असे संबोधले जाते. हिप हॉप प्रकार अत्यंत ऊर्जादायी आहे. जबरदस्त ऊर्जेनेच तो ‘परफॉर्म’ करावा लागतो. हिप हॉप संगीतासह ‘स्ट्रीट जॅझ’बरोबरही तो केला जातो. हा शांत नृत्य प्रकार नाही.
काही निवडक शहरांमध्ये शैक्षणिक कार्यशाळा, प्रकल्प, विविध कार्यक्रम, व्याख्याने आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांतर्गत जगभरामधून एक दिग्गज नृत्य कलाकाराची निवड करून त्यांच्या कडून एक सकारात्मक संदेश दिला जातो. प्रत्येक नृत्यप्रेमींसाठी जणू ही एक पर्वणीच ठरते. गेल्या दोन वर्षांत शांघाय आणि हवाना येथे हे सेलिब्रेशन होते आहे. यामध्ये जगभरातील दिग्गज कलाकार, विद्यार्थी आणि नृत्यप्रेमी आवर्जून हजेरी लावतात.