महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केल्याने मराठी कलाकारांनी मनोरंजनाला ब्रेक न देता, महाराष्ट्रा बाहेर जाऊन शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. बेळगाव, कर्नाटक, गोवा, हैदराबाद, आग्रा इत्यादी ठिकाणी गर्दी पासून लांब अशा ठिकाणी सध्या मराठी मालिकांचे चित्रीकरण करण्यात येत आहे. परंतू, आता महाराष्ट्रासोबत कर्नाटक, गोवा, बेळगाव, दिल्ली, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुद्धा कडक निर्बंधित लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मालिकांच्या चित्रीकरण टीमच्या चिंतेत भर पडली आहे.
सद्य स्थितीमध्ये गोव्यात जरी लॉकडाऊन असला तरी चित्रीकरणास बंदी नाही म्हणून, बऱ्याच हिंदी आणि मराठी मालिकांचं चित्रीकरण तेथे सुरु आहे. तेथील बायो बबल संकल्पनेत सर्व मालिकाचे चित्रीकरण करण्यात येणार आहेत. जसे क्रीकेट मध्ये खेळाडूंच्या सुरक्षितेसाठी बायो बबल संकल्पना राबविलेली असते, तसेच मालिकांच्या चित्रीकरणामध्ये सुद्धा त्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, कलाकार आणि संपूर्ण टीमला चित्रीकरणाची जागा आणि संबंधित हॉटेलच्या व्यतिरिक्त बाहेर कुठेही फिरण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे कलाकारांना भेटण्यासाठी बाहेरील कोणतीही व्यक्ती येऊ शकत नाही किंवा सेटवर शुटींग बघण्यासाठी देखील उपस्थित राहू शकत नाही. तसंच संपूर्ण टीमची नियमित आरटीपीसीआर टेस्ट देखील करण्यात येते.
सध्या गोव्यामध्ये मराठी मालिकांपैकी पाहिले न मी तुला, रंग माझा वेगळा, गुम है किसी के प्यार में, अग्गबाई सुनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं, ये हैं चाहतें, आपकी नजरों ने समझा, शौर्य और अनोखी की कहानी, या मालिकांचं शुटींग सुरु आहे तर देवमाणूस मालिकेचं शुटींग बेळगावमध्ये सुरु आहे. सध्या गोवा आणि कर्नाटकमध्ये सुद्धा लॉकडाउन असलं तरी, तेथील राज्य सरकारच्या परवानगीने सर्व कोरोना निर्बंधित नियमांचं पालन करुन, तेवढीच पूर्ण जबाबदारीने चित्रीकरण सुरु आहे.
सध्या मनोरंजन थांबू नये, आपल्या प्रेक्षकांची करमणूक थांबू नये यासाठी बहुतांश सर्वच मालिकांचं शुटींग महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. प्रत्येक मालिकेचा वेगळा सेट असल्याने मालिकेच्या चित्रीकरणासाठी नेमकं कोणत लोकेशन योग्य ठरू शकेल, कोनात ठिकाण निवडायचं हा गहन प्रश्न निर्मात्यांपुढे होता. कारण कलाकारांच्या तसेच सर्व टीमच्या आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षित वातावरण, मालिकेच्या पूर्वीच्या कथानकाशी साधारण मिळतंजुळतं असणार आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा परवडणारे लोकेशन निवडणं गरजेचे होतं. चालू मालिकेचा ट्रॅक लक्षात ठेवून, त्यालास साजेसे असे योग्य लोकेशन शोधणं हे एक प्रकारचे आव्हानचं निर्मात्यांपुढे ठाकलेल. मालिकेचा संपूर्ण संसार नव्यानं मांडताना प्रचंड धावपळ झाली, पण तरीही जिद्दीनं, मेहनतीने आणि सर्व टीमच्या सहकार्यानं हे आव्हान निर्मात्यांनी यशस्वीरीत्या आपल्या शिरावर पेललं.
शो मस्ट गो ऑन म्हणत विविध मालिकांच्या दिग्दर्शकांनी आणि सर्व टीमच्या सहकार्याने चित्रीकरण सुरळीत सुरु ठेवले आहे. एवढा पूर्ण सेट अप नव्याने तयार करण्याचा धाडसी निर्णय घेताना संपूर्ण टीमचं सहकार्य खूप गरजेच वाटत. याला दुजोरा देत सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या कार्यकारी प्रमुख माधुरी पाटकर म्हणाल्या, आपण सगळे एकत्रित काम करत आहोत हा विश्वासचं आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतो. ‘माझा होशील ना’ या मालिकेचे सध्या दमण येथे जैवसुरक्षित वातावरणात चित्रीकरण सुरु आहे, त्याचे निर्माते-लेखक सुबोध खानोलकर म्हणतात, सध्या थांबणं हा पर्याय आमच्या समोरचं उपलब्ध नव्हता. या कोरोनाच्या मनस्थितीमध्ये प्रेक्षकांसाठी नवीन भाग सादर करून मायबाप जनतेचे मनोरंजन करायचा निश्चय पक्का आहे. इथल्या एका रिसॉर्टच्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही ब्रम्हे कुटुंबाच्या घराचा सेटअप तयार केला असून, प्रत्येक गोष्ट जवळपास सेम दिसण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले गेले आहेत. प्रेक्षकांसाठी दर्जेदार विरंगुळा उपलब्ध करून देणं हेचं आमचं निस्वार्थ ध्येय असून, विशेष करून प्रेक्षकांकडूनही नव्या भागांचं स्वागत मोठ्या उत्साहाने केल जात आहे.