वर्षभराच्या कोरोनाच्या थैमानापासून काही काळ विश्रांती घेऊन कोरोनाने पुन्हा महिनाभरापासून डोके वर काढले आहे. झपाटय़ाने वाढणारया कोरोना केसेसमुळे वेळीच सतर्क झालेल्या पालिकेने मुंबईमध्ये होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातलेली आहे. गर्दी करून सोशल डीस्टन्सचा फज्जा उडवून सण साजरे करणे मुंबईकरांना महाग पडू नये तसेच कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी सार्वजनिक आणि खासगी जागेत सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
मागील वर्षी सुद्धा होळीच्या दरम्यानच कोरोनाचा कहर माजला होता. आत्ता यंदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असतानाच होळीचा सण आल्याने लोकांची होणारी गर्दी रोखण्यासाठी पालिकेने चार दिवस आधीच नियमावली जाहीर केली आहे. तसेच होळीच्या दरम्यान नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या पथकांकडून नजर ठेवली जाणार आहे. प्रशासनाने नियम मोडणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत. 28 मार्च रोजी येणाऱ्या होलिकोत्सव तर 29 मार्च रोजी साजरे होणारे धुलिवंदन व रंगपंचमी उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरी करण्यावर रोख लावण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने रेल्वे स्टेशन, बस स्थानके, चौपाट्या आदि जिथे भरपूर गर्दी होते अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी अँटिजन चाचण्या पार पाडण्यास वेग घेतला आहे. यामध्ये मुख्यत: दादर स्थानकात फेरीवाले, खासगी सुरक्षारक्षक आणि सर्वसामान्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. या केलेल्या चाचण्यांमध्ये एकूण 7 जणांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना संसर्गित रुग्णांचे मागील काही आठवड्यातील संख्या पाहता आता राज्यात आणि स्थानिक पातळीवरही प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं अवलंबण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे, नाशिक, मुंबईमध्येही विविध निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे.
काही दिवसांवर आलेल्या होळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोरोनाबाबतची सावधगिरी बाळगत होळी आणि धुलिवंदन सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची सध्याची वाढती संख्या आणि एकंदर धोका पाहता, खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी येणारं धुलिवंदनाचं पर्व हे खासगी आणि सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर पालिकेनं निर्बंधित केली आहे. पालिकेतर्फे “मी जबाबदार” या मोहिमे अंतर्गत निदान यावर्षी व्यक्तीगत पातळीवरसुद्धा हा उत्सव साजरा न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शासनाने आखून दिलेली नियमावली, घातलेले निर्बंध आणि केलेले आवाहन पाहता जर नियमांचं उल्लंघन झाल्यास साथरोग कायदा 1897, आपत्ती निवारण कायदा 2005 आणि भारतीय दंडसंविधाना अंतर्गत असणाऱ्या 1860 कायद्यान्वये कडक कारवाई केली जाणार आहे.
होळी आणि धुळवडीच्या निमित्तानं मुंबई आणि उपनगरीय परिसरामध्ये अनेक सामुहिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या करण्यात येतं. त्यामध्ये बॉलीवूड मधील कालालकर सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावतात तसेच बऱ्याच सोसायटी आणि घरांमध्येही होळी साजरी केली जाते. पण, कोरोनाचं संकट न वाढण्यासाठी या वर्षी मात्र सणाच्या उत्साहाला आळा घालयचा आहे. केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ, कर्नाटक गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. देशातील वाढीव रुग्णसंख्येपैकी मागील 24 तासांमध्ये आढळून आलेली रुग्णसंख्या याच 6 राज्यांतून आहे. सध्या केंद्र सरकारनं देशात कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासोबतच लसीकरणाच्या प्रक्रियेलाही वेग देण्याचे आदेश जारी केले आहेत. असं सर्व प्रयत्न सुरु असतानंही देशात कोरोनाची सद्यस्थिती पाहता सर्व नागरिकांच्या सतर्कतेनं आणि सहकार्यानंच या महामारीवर जीत मिळवणे शक्य होणार आहे.