31 C
Mumbai
Saturday, April 13, 2024

सावरकरांचे बलिदान विसरता येणार नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष काय म्हणाले

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी सावरकर...

भारतीय विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

एक भारतीय विनोदी अभिनेता, ज्याला अनेकदा 'गजोधर'...

Mahindra Scorpio-N सादर: एवढी स्वस्त, की लगेच बूक कराल

महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ सादर केली आहे....
HomeDevotionShree Swami Samarth श्री स्वामी समर्थ - कलियुगातील दत्तावतार !

Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ – कलियुगातील दत्तावतार !

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमदभगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भूतलावर जेव्हा अधर्म, अनीती यांचं प्राबल्य वाढतं, अनाचार माजतो त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो! श्री विष्णूंचे दशावतार हे त्याचंच उदाहरण आहे. वेद आणि पुराणकाळात भक्तांच्या उध्दारार्थ हेच कार्य करण्यासाठी श्री दत्तावतार झाला. अत्रिऋषी आणि अनसूयेच्या पोटी श्री गुरुदत्तानी तीन बाळांच्या रुपात ब्रह्मा-विष्णू-महेश होऊन जन्म घेतला आणि हेच पुढे त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त म्हणून भक्तांचा उद्धार कर्ते झाले.

swami samarth palkhi

दत्तसंप्रदयाची ही परंपरा पुढे जागती ठेवण्यासाठी कलियुगात पीठापुर इथे चौदाव्या शतकात श्रीपाद श्रीवल्लभ हे परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणून जन्मास आले. त्यांनी आपला अवतार समाप्त करताना ‘पुन्हा भेटेन’ हे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचं प्रत्यंतर म्हणून श्री नृसिंहसरस्वती हे वऱ्हाडात कारंजा येथे अवतीर्ण झाले. इ स १३७३ ते १४५८ या काळात आपले अवतारकार्य करताना ते १४५७ च्या सुमारास श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि नंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून पुन्हा प्रकट झाले. तेच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. दत्तपरंपरेतले तिसरे सत्पुरुष आणि दत्तांच्या विभूतितत्वाचा ‘चौथा अवतार’ म्हणून ते मानले जातात. श्री स्वामी समर्थांनी स्वतःच ‘मूळ पुरुष वडाचे झाड आणि नाव नृसिंहभान आणि दत्तनगर हे वसतिस्थान’ असल्याचं भक्तांना सांगितलं त्यामुळे दत्तसंप्रदायात त्यांचं स्वरूप हे दत्ताचं चौथं अवतारित्व मानण्यात आलं. यामुळेच दत्तभक्त हे स्वामींचे सुद्धा भक्तच झाले.

श्री स्वामी समर्थ कर्दळीवनातून प्रकट झाले Shree Swami Samarth 

श्री स्वामी समर्थ कर्दळीवनातून प्रकट झाले त्यावेळी वारुळातून प्रकट झाले. लाकडं तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारूळावर बसला तो स्वामींच्या मांडीवर बसला आणि स्वामी समधीतून जागे झाले असं सांगितलं जातं.कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. स्वामी तिथून काशिक्षेत्री प्रकट झाले आणि गंगाकाठाने कलकत्ता,जगन्नाथपुरी मार्गाने गोदातीरी आले. मंगळवेढा इथे प्रकट झाल्यावर ते रानात वास्तव्य करीत, क्वचित गावात येत. तेथे एक ब्राम्हण कुटुंब त्यांना भोजन देत असे. तिथलं वास्तव्य संपवून स्वामी पंढरपूर,मोहोळ,सोलापूर इथे वास्तव्य करून श्री अक्कलकोट इथे आले. तिथे त्यांनी तीन दिवस अन्नग्रहण केलं नव्हतं. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन दिलं. त्यांच्या घरातली मंडळी ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’असे म्हणत. हळूहळू स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचीती अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली आणि लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले.राजेसाहेब भोसले यांची स्वामींवर दृढ निष्ठा बसली. स्वामी कधीकधी राजवाड्यात जात व एखादेवेळी तिथे चार चार दिवस मुक्कामालाही असत.

swami samarth temple

अक्कलकोट इथे स्वामी प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपश्चर्या केली. बालोन्मत्तपिशाच्चवृत्तीचे सिद्ध पुरुष असल्याने तेथील वास्तव्यात स्वामींनी अनेक चमत्कार केले आणि राजापासून रंकापर्यंत अनेकांवर कृपावृष्टी केली. आपण यजुर्वेदी ब्राम्हण असून आपले गोत्र काश्यप आणि रास मीन असल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं होतं. श्री स्वामी समर्थांची कांती तेज:पुंज ,दिव्य होती आणि वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. बाळप्पा आणि चोळप्पा या शिष्यांवरही त्यांनी कृपा केली.

swami samarth maharaj

 

अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे वास्त्यव्य Shree Swami Samarth in Akkalkot

अक्कलकोट इथे आल्यावर शेवटपर्यंत तिथेच होते. सर्वसामान्य भाविकांना त्यांनी आपलंसं केलं. अनेक जातीधर्माचे,बहुजन समाजाचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचं बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचं असे तर कधी ते रौद्र रूप धारण करीत. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, कित्येकांना सन्मार्गाला लावलं. प्रत्येकाच्या अधिकारानुसार स्वामींनी त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता,स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे अनेक भक्तांना त्यांनी आपलंसं केलं. त्यांच्या अवतारकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता आणि भारतीय जनता अन्यायात भरडली जात होती. जनतेच्या मनात त्यांनी आत्मसन्मान जागवला. भक्तग्णांमध्ये हिंदूंप्रमाणेच मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या लोकांनाही त्यांनी समाविष्ट केलं होतं. त्यांच्यामागे मोठा शिष्यपरिवारही होता त्यामुळे समर्थ परंपरेचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर झाला. प्रमुख शिष्यांमध्ये कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, श्रीशंकरमहाराज, श्री केळकरबुवा, श्री स्वामीसुत, श्री आनंदभारती, श्री गजानन महाराज, श्री मोरेदादा, आनंदमहाराज, गुलाबराव महाराज हे प्रमुख शिष्य म्हणून गणले जातात.या शिष्यांनी अनेक ठिकाणी स्वामी समर्थ मठांची स्थापना केली, स्वामी मंदिरं आणि सेवा केंद्र स्थापन केली आहेत.

असे पातकी दीन मी स्वामीराया।
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया।
नसे अन्य त्राता जगी या दीनाला।
समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला।।

असे अनेक श्लोक, पदं स्वामीभक्तांकडून रचली गेली आणि आपल्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी ‘भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे‘ या शब्दांनी आश्वस्थ केलं. अनेक रुपात अनेक वेळी आपल्या अवताराची प्रचीती स्वामिनी आपल्या भक्तजनांना दिली आणि चैत्र वद्य त्रयोदशी, १८७८ मध्ये अक्कलकोट येथे स्वामींनी समाधी घेतली.

swami samarth paduka aani shayan kaksh

‘स्वामी लीलामृत, श्री गुरुलीलामृत’ या ग्रंथांमधून स्वामींच्या महतीची गाथा आपल्याला वाचायला मिळते. श्री साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, हरीबाबा महाराज फलटण, शंकर महाराज यांच्यावर स्वामींचा विशेष प्रभाव दिसून येतो. केवळ मूर्तिपूजाच करणं हे मनुष्यप्राण्याचं कर्तव्य नाही तर परमात्मप्राप्ती हे खरं ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी माणसाने प्रयत्नशील असावं हीच स्वामींची शिकवण आचरत राहणं हे आजच्या काळात गरजेचं आहे!

स्वामींची महती वर्णन करताना असं म्हटलं जातं की स्वामी अक्कलकोटचे म्हणजे बुद्धीगम्य आहेत. ‘अकलसे खुदा फचानो’ असं ते स्वतःच म्हणाले होते. निष्क्रिय आणि आणि जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींची कृपा आणि शक्तीचा बोध होणार नाही असं मानलं जातं. ते सर्वशक्तिमान असे विश्वमालक आहेत. ‘अवधूत’ म्हणजे सर्वोच्च संन्यासी आणि परमहंस असलेले स्वामी स्वयंभू आणि अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम आणि रूप घेतात. ते ओंकारातील पहिला स्वर म्हणजे ‘अ’ म्हणजेच भगवान विष्णू आहेत. त्यांना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. संतांप्रमाणे त्यांची कळवळ्याची जाति आहे आणि त्यांचं सामर्थ्य अथांग,अनुपम आहे. सर्व देवता आणि ऋद्धि-सिद्धी स्वामींची पूजा करतात, त्यांना काम,क्रोध असले विकार नाहीत. ते अतिसूक्ष्म आणि अतिविराट वटवृक्षासारखे आहेत. त्यामुळे साध्या पार्थिव देहाला त्यांचं दर्शन सहसा होत नाही.

swami samarth mandir gabhara

सकल जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी या मृत्यूलोकात सदेह अवतार घेतलेला आहे आणि स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच भक्ताला दर्शन देणारे असा त्यांचा लौकिक आहे. ‘मला नमस्कार करा किंवा करू नका, माझं नामस्मरण,पूजा करा किंवा करू नका, मी आहेच’ असं ते सांगत असत. भक्तावर ते नित्य प्रसन्न असत आणि त्याच्या पापवृत्तीवर किंवा संकटावर रागावून ते त्याची चित्त आणि देहशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षपदी नेत असत. लोकांच्या अपराधाना ते क्षमा करत असत. आपला प्रियभक्त आपल्यापासून दुरावू नये असं स्वामींना वाटतं आणि अडचणीच्या काळात नामरूपाने सदैव भक्ताबरोबर राहून अडचणीच्या काळात भक्ताचा मार्ग सुकर करतात. नामाला कधी सोडू नये, आपलं पूर्वसंचित संपल्याशिवाय साधना फळाला येत नाही, दुःख-संकटं असतील तरच सुखाची किंमत कळते आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीवही होते म्हणून आयुष्यात काही मिळवायचं असेल तर केवळ स्वामीकृपाच आपल्याला तारील ही भावना मनात बाळगावी कारण,

‘श्री स्वामीनाम नौका भवसागरी तराया
भ्रम भोवऱ्यात अडली,नौका कधी न बुडली
धरुनी सुकाणू हाती बसलेत स्वामीराया’

हीच भावना स्वामींच्या भक्तांची असते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

– सौ.अर्चना देवधर

 

- Advertisment -

Most Popular