संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव पुन्हा एकदा झालेला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे प्रत्येक भारतीय आता आपापल्या घरामध्ये बंदिस्त केला गेला आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नागरिकांना कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध पाळणे अनिवार्य आहे आणि कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होईपर्यंत जास्तीत जास्त वेळ घरातचं काढावा लागणार आहे. या संकट काळात घरात बसून कंटाळा येऊ नये यासाठी अमेरिकन सर्च जायंट गुगलने असं एक टूल विकसित केले आहे, ज्याचा वापर करून युजर्स ताज महालाची सफर करता येऊ शकते.
गुगलने विकसित केलेली ही नवीन सुविधा वापरुन कोणताही युजर घरी बसून ताज महालचे संपूर्ण सफर करू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने, जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गुगलबरोबर भागीदारीमध्ये एक नवीन टूल विकसित केलं आहे. या टूलच्या मदतीने युजर जगभरातील कोणत्याही लोकप्रिय ठिकाणांची व्हर्च्युअल ट्रीप करु शकतो. घरात बसून बसून कंटाळलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी हा एक सुखद अनुभव नक्कीच ठरेल. कारण यामुळे प्रत्येक युजर घरातुनच जगभराच्या विविध ऐतिहासिक किंवा कोणत्याही स्थळांचे भेटी देऊन आनंद घेऊ शकतो.
Google ने 10 UNESCO हेरिटेज साइट्ससाठी एक मायक्रो साइट तयार केली आहे, जी युजर्सच्या व्हर्च्युअल ट्रीप घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे व्हर्चुअल ट्रीपसाठी कोणताही युजर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन जगभरातल्या हेरिटेज स्थळांना भेटी देणे शक्य होणार आहे.
https://artsandculture.google.com/story/zAUxtGbI2DyODQ
गुगलने या टूलद्वारे युजर्सना ताज महालसह Serengeti नॅशनल पार्क, Colosseum आणि The Yosemite नॅशनल पार्कच्या व्हर्च्युअल टूरवर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या मायक्रोसाईटच्या मुख्यपृष्ठास भेट दिल्यानंतर तुम्हाला त्यासंदर्भातील सर्व माहिती मिळेल, त्याचा इतिहास, रचना, वास्तू कधी बांधली, कशासाठी बांधली, कोणी बांधली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरंदेखील तुम्हाला या साईटवर पाहायला मिळतील.
मानवी जीवनाला जसजशी गती मिळत आहे, तसतशी दिवसेंदिवस त्यांची प्रगती वाढू लागली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संबंध जग अधिकाधिक जवळ येऊ लागले असून, माऊसच्या एका क्लिकवर जग पालथे घालणे आणि तेसुद्धा विना खर्चाचे शक्य झाले आहे. इंटरनेटमुळे पृथ्वीतलावरील कोणत्याही ठिकाणची माहिती काही क्षणात गुगल केल्यावर मिळून जाते. त्यामुळे दळणवळण गतीमन झाल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्षणामध्ये जाणे देखील शक्य बनले आहे.