शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘संघर्ष’ डॉ. विशाल चंद्रकार

वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करत आहेत.

Must read

दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणीय बदलांचा थेट फटका शेतीला बसत असून, त्याचे गंभीर परिणाम शेतकरी वर्गावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. चंद्रकार म्हणाले, ‘शेतीसाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याने, पावसाच्या अनियमिततेमुळे पीक नुकसान वाढल्याने तसेच रानडुक्कर, माकड, वानर यांसारख्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे अनेक शेतकरी शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून, यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी भारतीय किसान संघ देशपातळीवर सक्रिय आहे. भारतीय किसान संघ ही देशातील मोठी शेतकरी संघटना असून, ती केवळ आंदोलनापुरती मर्यादित नाही, तर शासनासोबत समन्वय ठेवून शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे.

रासायनिक खते व औषध उत्पादक कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच कोकणातील पिकांच्या गरजेनुसार शेती अवजारे शासकीय योजनांत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्रकार, महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री चंदन पाटील, रत्नागिरी जिल्हा मंत्री धनंजय जोशी उपस्थित होते. बागायतीसाठी वीज जोडणीची मागणी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नारळ व सुपारी बागायतींसाठी सौर कृषी पंप प्रभावी ठरत नसल्याने कृषी वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोडींकर यांच्याकडे करण्यात आल्याचे डॉ. चंद्रकार यांनी सांगितले.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article