गडचिरोली हादरली! चामोर्शीत पतीने पत्नीला दुचाकीवरून पाडले; भररस्त्यात चाकूने केले सपासप वार

बामणपेठ जंगल मार्गावरील धक्कादायक घटना; गंभीर जखमी पत्नीवर गडचिरोलीत उपचार सुरू, आरोपी पती फरार

Must read

काय घडली नेमकी घटना? कनिका दास असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. त्या आपल्या दुचाकीने बामणपेठ जंगल मार्गावरून जात असताना, त्यांचे पती ब्रजकेश दास यांनी त्यांचा रस्ता अडवला. अत्यंत संतापलेल्या ब्रजकेश यांनी कनिका यांच्या दुचाकीला जोराचा धक्का देऊन त्यांना भररस्त्यात खाली पाडले.

कनिका काही समजण्याच्या आतच, ब्रजकेश यांनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार चाकूने कनिका यांच्यावर एकामागून एक सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यांनी कनिका यांच्या पोटात, हातावर, पायावर आणि थेट मानेवर जीवघेणे वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला त्याच अवस्थेत सोडून आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला.

महिलेची प्रकृती गंभीर या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे रस्ता परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कनिका यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने आणि शरीरावर खोल जखमा झाल्याने, प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील मुख्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार हा घरगुती वादातून झालेला प्रकार असावा. या घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले असून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या फरार पतीचा कसून शोध घेत आहेत.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article