HomeDapoliदापोली बाजारपेठेत 'काळू-बाळू'ची दहशत...

दापोली बाजारपेठेत ‘काळू-बाळू’ची दहशत…

भाजीपाला फस्त केल्याने गरीब भाजी विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

कोकणचे ‘महाबळेश्वर’ म्हणून ओळख असलेल्या दापोली शहरात सध्या मोकाट, उनाड गुरांचा त्रास शिगेला पोहोचला आहे. विशेषतः बाजारपेठेत ठाण मांडून बसलेली ‘काळू’ आणि ‘बाळू’ अशी ओळख असलेली बैलांची जोडी व्यापारी, भाजी विक्रेते आणि ग्राहकांसाठी रोजची डोकेदुखी बनली आहे. भाजी फस्त करण्यापासून वाहनांची मोडतोड आणि रहदारी ठप्प होईपर्यंत त्यांच्या धुडगुसाने बाजारपेठेतील व्यवहार विस्कळीत झाले आहेत. या बैलांच्या जोडीचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. दिवसभर बाजारात वावरत हे बैल भाजी मंडईतील गाड्यांवर अचानक धाड टाकतात. भाजीपाला फस्त केल्याने गरीब भाजी विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकींना धडक देऊन त्या पाडतात. परिणामी अनेक वाहनधारकांचे नुकसान झाले आहे.

अरुंद रस्त्यांवर कोंडी, भीतीचे वातावरण दापोलीची बाजारपेठ आधीच अरुंद त्यात हे बैल रस्त्याच्या मध्यभागी उभे राहतात किंवा आपसात झुंज देतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. हे बैल शिंगे उगारून अंगावर धावून जाण्याच्या घटना घडल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठ मध्ये या बैलांची जोडी बघितले की, बहुतांशी नागरिक दुसऱ्या मार्गान मार्गक्रमण होतात. ‘आम्ही दुकान चालवायचे की दिवसभर बैल हाकलत बसायचे?’ असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुकानासमोर ठाण मांडून उभे राहिल्याने ग्राहक आत येण्यास कचरतात. हटवण्याचा प्रयत्न केल्यास बैल अधिक आक्रमक होतात असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. नगरपंचायतीकडे लक्ष वेधण्याची मागणी शहरातील वाढत्या त्रासाकडे दापोली नगरपंचायतीने तातडीने लक्ष देऊन या उनाड गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments