HomeDapoliयोगेश कदम यांना आघाड्यांचे आव्हान, रोजगार व समाजाधारित राजकारण

योगेश कदम यांना आघाड्यांचे आव्हान, रोजगार व समाजाधारित राजकारण

दोन्ही गटांत तीन माजी जिल्हा परिषद सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवार निश्चितीनंतर आता प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, यावेळी पक्षीय आघाड्यांची गणिते, स्थानिक नेतृत्वाची प्रतिष्ठा आणि तालुक्यावरचे वर्चस्व या मुद्द्यांभोवती निवडणूक रंगणार आहे. खऱ्या अर्थाने मंडणगडमध्ये राज्यमंत्री योगेश कदमांच्या शिवसेनेपुढे एकत्रित आलेल्या नव्या आघाड्यांनी आव्हान उभे केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि मनसे यांनी एकत्रित आघाडी उभारली आहे. काँग्रेस आणि भाजपनेदेखील दोन जागांवर आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. तसेच बसपा आणि वंचित बहुजन आघाडीही संयुक्तपणे मैदानात उतरली आहे. त्यामुळे यावेळी लढत केवळ पक्षांमध्ये नसून, आघाड्याविरुद्ध एकला चलो रे अशी स्पष्ट रेषा उमटली आहे.

उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचारात रोजगारनिर्मिती, भौतिक विकास, स्थानिक प्रश्न तसेच समाजाधारित राजकारण हे प्रमुख मुद्दे केंद्रस्थान राहणार आहेत. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा रस्ते, पाणीपुरवठा, युवकांचे स्थलांतर आणि महिलांच सहभाग हे मुद्दे मतदारांवर प्रभाव टाकतील, असा अंदाज राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषद बाणकोट गटात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात प्रमुख लढत होत आहे. भिंगळोली गटात शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उबाठा अशी थेट राजकीय टक्कर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने येथे सर्वसाधारण आरक्षणातून महिला उमेदवार देत वेगळे राजकीय समीकरण उभे केले आहे. दोन्ही गटांत तीन माजी जिल्हा परिषद सदस्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उबाठा आघाडी, असा त्रिकोणी संघर्ष निर्माण झाला आहे. इस्लामपूर गणात माजी सभापतींना आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उबाठा गटातून थेट आव्हान देण्यात आले असून, हा मतदारसंघ लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

कदम-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक – एकंदरीत या निवडणुकीत मंडणगड तालुका हा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अस्तित्वासोबत राज्यमंत्री योगेश कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांचे हे होम ग्राउंड असल्याने निकालातून तालुक्यावर नेमके कोणाचे वर्चस्व आहे, हे स्पष्ट होणार आहे. निवडणूक निकालानंतर केवळ स्थानिक सत्तासमीकरणच नव्हे, तर आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा जनादेश मंडणगडमधून मिळणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या तालुक्याकडे लागले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

- Advertisment -

Most Popular

Recent Comments