कुंभार्ली घाटातून अवजड मालवाहतूक वाढलेली आहे. १६ ते ३२ चाकी ट्रक या रस्त्यातून प्रवास करतात. या ट्रकची चाके वळणावर घासली जातात त्यामुळे खड्डे पडतात. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटार नसल्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबून डांबर आणि खडी ठिसूळ होते. रस्ते दुरुस्तीसाठी अंदाज पत्रकात दोन-तीन प्रकारचे डांबराचे थर धरले जाते. प्रत्यक्षात काम करताना डांबराचा एकच थर मारला जातो आणि समजूत काढली जाते, असा नागरिकांचा आरोप आहे. घाटातील नाल्यांमध्ये दरडींची कोसळलेली माती अजूनही बाहेर काढण्यात आलेली नाही. अतिपाऊस व संततधारेमुळे खडी व डांबर यांची पकड सैल होऊन माती वर येते. त्यामुळे खड्डे वाढत आहेत. घाटातील रस्ते दुरुस्तीचा विषय आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या पाच वर्षांत या घाटातील रस्त्यांवर सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे; मात्र हा खर्च केवळ तीन महिन्यांचाच दिलासा ठरत आहे. दरवर्षी पावसाळा आला की, घाटातील बारा वळणांवरील रस्ता पूर्णपणे वाहून जातो, ज्यामुळे दुरुस्तीच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जानेवारी महिन्यातच या घाटात सात लहान-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळा संपून अनेक महिने उलटले तरी दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे.
मार्चमध्ये काम सुरू करायचे आणि जूनच्या पावसात ते वाहून जायचे, हे चक्र कायम असून, हा जनतेच्या पैशांचा निव्वळ अपव्यय ठरत आहे. सुरक्षित प्रवासासाठी घाटात कायमस्वरूपी आणि दर्जेदार उपाययोजना करण्याची मागणी आता वाहनचालकांमधून जोर धरत आहे. घाटातील खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर रस्त्याची जी खडी बाहेर पडलेली आहे, त्यात लहान आकाराचे दगडगोटे आहेत. त्यामुळे डांबर एकसंध होत नाही. अनेक ठिकाणी खडीऐवजी नदीतील लहान आकाराचे दगडगोटे वापरले जातात. कुंभार्ली घाट परिसरातील माती भुसभुशीत आहे. खड्डे भरताना ती कडक करण्यासाठी प्रथम त्यावर खडी व मुरूम टाकून त्यावर पाणी मारून वारंवार रोलर फिरवून ती जागा कडक करणे गरजेचे आहे. त्यानंतर त्यावर डांबरीकरण केले पाहिजे. प्रत्यक्षात ही पद्धत वापरली जात नाही. त्यानंतर लगेचच वाहतूक सुरू झाल्यामुळे रस्ता अधिक काळ टिकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
खड्डे का पडतात ? – शास्त्रीय पद्धतीने रस्तेदुरुस्ती केली जात नसल्याने खड्डे पुन्हा पडतात. खड्डे भरताना डांबरमिश्रित खडी खड्ड्यात ओततात. खड्डे भरण्यासाठी एकाच प्रकारची, आकाराची खडी वापरली जाते. खड्डा भरण्यापूर्वी खड्याच्या आजूबाजूला खोदाई केली जात नाही किंवा साफसफाईही होत नाही. खड्डा तसेच बुजविल्यानंतर त्याचा तत्काळ वापर सुरू होतो आणि त्यामुळे पुन्हा खड्डा तयार होतो.
खड्डे बुजविणाऱ्या यंत्राची गरज – रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ‘स्पॉट व्होल्ड फिलिंग मशीन’ अर्थात खड्डे बुजविणाऱ्या यंत्राचा उपयोग झाला तर ते अधिक टिकावू होतील. योग्य तापमानावेळी या यंत्रात डांबर आणि अन्य माल टाकून खड्डे बुजविले जातात. पावसाळ्यात मात्र या यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. यंत्राद्वारे खड्डा बुजविताना आधी तो थोडा खोल केला जातो. त्यानंतर सामान्य वातावरणात खड्यांमध्ये मटेरिअल टाकून ते दाबले जाते. त्यानंतर तासाभरात तो रस्ता वापरण्यासाठी तयार होतो. स्पॉट व्होल्ड फिलिंग मशीन असेल अशाच मक्तेदाराला दुरुस्तीचे काम दिले पाहिजे.
