मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विविध क्षेत्रांसाठी तब्बल १४ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जलसंपदा, कृषी, पायाभूत सुविधा आणि तरुणांच्या रोजगारावर विशेष भर देण्यात आला आहे.
१. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: धरणांतील गाळ काढण्याचे धोरण राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी सरकारने जलसाठ्यांमधील गाळ आणि वाळू काढण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. प्रायोगिक तत्त्वावर सहा मोठ्या प्रकल्पांमधून हा गाळ काढला जाईल. यामुळे धरणांची पाणी साठवण क्षमता तर वाढेलच, पण शेतकऱ्यांना शेतीसाठी सुपीक गाळही विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
२. नाशिक आणि कोकणासाठी विशेष तरतूद नाशिक जिल्ह्यातील ‘अंबोली-वेळुंजे’ प्रवाही वळण योजनेसाठी सरकारने ४९ कोटी २६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच, कोकणच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेली ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ आता पुढील तीन वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील स्थानिक संसाधनांचा वापर करून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
३. पदभरती आणि नोकरीच्या संधी मृद व जलसंधारण विभागाची पुनर्रचना करण्यात आली असून, तब्बल ८ हजार ७६७ नवीन पदांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय कामाला गती मिळेल आणि हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होईल.
४. आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण भरती प्रक्रियेदरम्यान ज्या उमेदवारांनी वय किंवा परीक्षेच्या संधींमध्ये आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांची नियुक्ती आता केवळ राखीव प्रवर्गातूनच केली जाईल. अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
५. पुण्याच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला गती पुणे महानगरपालिकेच्या मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी आवश्यक असलेली तीन शासकीय जमिनींची जागा विनामूल्य हस्तांतरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे पुण्यातील नदी पात्राच्या सुशोभीकरणाचे काम आता वेगाने पूर्ण होईल.
या व्यतिरिक्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानला वार्षिक अनुदान, आश्रमशाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि नाशिक रिंग रोड प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्कात सवलत असे अनेक लोकहितवादी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
