आयपीएलनंतर लगेच कसोटी सामना; बुमराह-सिराजला मिळणार विश्रांती? बीसीसीआयसमोर पेच!

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यासाठी भारतीय वेगवान गोलंदाजांच्या निवडीचे आव्हान आणि नव्या खेळाडूंना मिळणारी संधी.

Must read

भारतीय क्रिकेट चाहत्यांचे डोळे सध्या आयपीएल २०२६ च्या थरारावर खिळलेले असले, तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) गोटात मात्र एका वेगळ्याच चिंतेने घर केले आहे. आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे. या कमी कालावधीमुळे खेळाडूंच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’चा (कामाचा ताण) प्रश्न ऐरणीवर आला असून, विशेषतः वेगवान गोलंदाजांची निवड करताना निवडकर्त्यांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे दिसत आहे.

मुख्य गोलंदाजांच्या विश्रांतीची शक्यता जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या प्रमुख वेगवान गोलंदाजांच्या फिटनेसबद्दल बीसीसीआय सध्या अत्यंत सावध आहे. मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान लवकर संपल्याने बुमराहला काहीसा विश्रांतीचा काळ मिळाला आहे, मात्र तरीही आगामी महत्त्वाचे दौरे लक्षात घेता त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळवायचे की नाही, याबाबत साशंकता आहे. दुसरीकडे, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा जर आयपीएलच्या प्लेऑफमध्ये खेळले, तर त्यांना कसोटीसाठी तयार व्हायला पुरेसा वेळ मिळणार नाही.

नव्या दमाच्या खेळाडूंना सुवर्णसंधी? प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिल्यास काही नव्या चेहऱ्यांना टीम इंडियाची ‘कसोटी कॅप’ मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांनी इंडिया-A संघासाठी प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच, जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीश कुमार रेड्डीच्या नावाचा विचार करून संघात संतुलन राखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

फलंदाजीमध्ये तडजोड नाही बीसीसीआयने गोलंदाजीमध्ये बदलांचे संकेत दिले असले तरी, फलंदाजीच्या बाबतीत मात्र ‘नो कॉम्प्रमाईज’ धोरण स्वीकारले आहे. कसोटी क्रिकेटचे महत्त्व कमी होऊ नये, यासाठी अनुभवी आणि कसलेल्या फलंदाजांनाच मैदानात उतरवण्याचा मानस निवडकर्त्यांचा आहे. त्यामुळे भारतीय संघ एका मजबूत फलंदाजी फळीसह अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी सज्ज होईल.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article