चीनच्या इंजिनिअरची कबुली; ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला केली होती मदत

भारतासोबतच्या संघर्षात चीनने पाकिस्तानला दिले होते रिअल टाईम इनपुट; चिनी इंजिनिअरचा मोठा खुलासा.

Must read

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षात चीन नेहमीच पडद्यामागून हालचाली करत असतो, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र, आता पहिल्यांदाच एका चिनी इंजिनिअरने कॅमेऱ्यासमोर ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला तांत्रिक मदत केल्याची कबुली दिली आहे. यामुळे भारताने केलेले आरोप आता अधिकृतरीत्या खरे ठरताना दिसत आहेत.

काय आहे हे प्रकरण? ७ मे २०२५ रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. या युद्धाच्या काळात चीनने उघडपणे पाकिस्तानची पाठराखण केली होती. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलवर (CCTV) बोलताना ‘चेंगडू एअरक्राफ्ट डिझाइन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे अभियंता झांग हेंग यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत.

कडाक्याची उष्णता आणि युद्धाचा थरार झांग हेंग यांनी सांगितले की, संघर्षाच्या काळात त्यांची टीम पाकिस्तानमध्ये तळ ठोकून होती. “तिथे मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात तापमान ५० अंश सेल्सिअसच्या वर जात असे. कानावर सतत लढाऊ विमानांचा प्रचंड आवाज आणि एअर रेड सायरन पडत होते. अशा कठीण परिस्थितीत आम्ही पाकिस्तानची J-10CE लढाऊ विमाने चोवीस तास युद्धासाठी सज्ज ठेवत होतो,” असे हेंग यांनी मुलाखतीत नमूद केले.

चीनची ‘लाईव्ह लॅब’ रणनीती भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंग यांनी यापूर्वीच दावा केला होता की, चीनने या संघर्षाचा वापर एखाद्या ‘लाईव्ह लॅब’सारखा केला. चीनने आपल्या सॅटेलाईट नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या हालचाली टिपल्या आणि त्याची ‘रिअल टाईम’ माहिती (Input) पाकिस्तानला पुरवली. हेंग यांच्या कबुलीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, चीनने केवळ शस्त्रेच विकली नाहीत, तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर तांत्रिक रसदही पुरवली.

शस्त्रास्त्रांची बाजारपेठ आणि पाकिस्तानची हतबलता पाकिस्तान सध्या शस्त्रास्त्रांसाठी ८०% चीनवर अवलंबून आहे. चिनी बनावटीची J-10CE आणि JF-17 ही विमाने पाकिस्तानच्या हवाई दलाचा मुख्य कणा आहेत. मात्र, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ आणि चिनी रडार यंत्रणा यशस्वीरीत्या उद्ध्वस्त केल्या होत्या, ज्यामुळे चीनच्या तंत्रज्ञानावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

आता चीन पाकिस्तानला आपली पाचव्या पिढीतील अत्याधुनिक ‘J-35’ स्टील्थ फायटर जेट्स विकण्याच्या तयारीत आहे. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानला भारतासमोर उभे करून चीन स्वतःच्या शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे.

More articles

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Latest article