छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि प्रेक्षकांचा लाडका होस्ट ऋत्विक धनजानी पुन्हा एकदा आपल्या साहसी वृत्तीचे दर्शन घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 15) या रिअॅलिटी शोच्या १५ व्या सीझनमध्ये ऋत्विक तिसऱ्यांदा एन्ट्री करत आहे. मात्र, यावेळी तो केवळ स्टंट्सच नाही, तर स्वतःच्या स्वभावातील एका मोठ्या ‘शत्रू’शीही दोन हात करणार आहे.
“राग माणसाला आतून पोखरतो” एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ऋत्विकने आपल्या भीतीबद्दल धक्कादायक खुलासा केला. आपण सहसा उंची, पाणी किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांना घाबरतो, पण ऋत्विकच्या मते त्याचा सर्वात मोठा ‘डर’ त्याचा ‘राग’ (Anger) आहे. तो म्हणाला, “माझा राग हा माझा सर्वात मोठा शत्रू आहे. हे असं संकट आहे जे माणसाला आतून पोखरून काढतं. मी दररोज यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपण स्वतःवरचे नियंत्रण गमावतो.”
तिसऱ्यांदा शोमध्ये येण्यामागचे कारण ऋत्विक याआधी सीझन ८ आणि ‘मेड इन इंडिया’ एडिशनचा भाग होता. पुन्हा एकदा या शोमध्ये परतण्याबद्दल तो सांगतो की, त्याला जोखीम घ्यायला आवडते. “हा शो माझ्यासाठी एखाद्या उत्सवासारखा आहे. हेलिकॉप्टरमधून उडी मारणे, धोकादायक स्टंट करणे आणि त्या बदल्यात पैसे मिळणे, यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते?” असे तो मिश्किलपणे म्हणाला.
आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन नेहमी हसतमुख दिसणाऱ्या ऋत्विकने त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांवरही भाष्य केले. तो सांगतो की, आधी तो भविष्याची खूप काळजी करायचा आणि भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसायचा. पण आता तो ‘आज’ मध्ये जगायला शिकला आहे. केपटाऊनमध्ये होणाऱ्या या नव्या प्रवासात ऋत्विक आपल्या रागावर विजय मिळवून ट्रॉफी जिंकणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
